Employee Refused Leave For Brother’s Wedding, Resigns Immediately: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर दररोज शेकडो नोकरदार त्यांच्या कामाच्या ठिकाणचे अनुभव शेअर करत असतात. यामध्ये काही चांगले तर काही वाईट अनुभव असतात. अशात, एका कंपनीत चार वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने भावाच्या लग्नासाठी सुट्टी नाकारली, म्हणून त्याने थेट राजीनामाच दिला. याबाबत स्वतः त्या कर्मचाऱ्याने रेडिटवर पोस्ट लिहिली आहे.

पोस्टमध्ये या कर्मचाऱ्याने, त्याने कंपनीसाठी काय काय केले याची यादीच दिली आहे. यामध्ये कार्यालयीन वेळेनंतरही काम करत राहणे, अतिरिक्त जबाबदाऱ्या स्वीकारणे, कनिष्ठांना मार्गदर्शन करणे आणि कंपनी आर्थिक अडचणीत असताना कमी पगारावरही काम करणे यांचा समावेश आहे.

यावेळी त्याने असेही स्पष्ट केले की, कोणत्याही पगारवाढीशिवाय त्याने कंपनी सोडून गेलेल्या सहकाऱ्यांच्या कमाचा भारही सहन केला होता. इतक्या निष्ठेने काम करत असल्याने, त्याला असे वाटले की त्याच्या सख्ख्या भावाच्या लग्नाला अमेरिकाला जाण्यासाठी रजा मागणे यात काहीही चुकीचे नाही. यासाठी त्याने तीन आठवड्यांपूर्वीच १५ दिवसांच्या रजेचा अर्ज केला होता.

भावाचे लग्न की नोकरी?

कर्मचाऱ्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “इतक्या प्रामाणिपणे आणि निष्ठेने काम करणाऱ्या कर्मचाऱ्याशी सौजन्याने वागण्याऐवजी कंपनीच्या व्यवस्थापनाने मला अल्टिमेटम दिला आणि भावाचे लग्न किंवा नोकरीचा राजीनामा यातील एकाची निवड करण्यास सांगितले. यातून मार्ग काढण्यासाठी मी रजेचे दिवस कमी करण्याचा प्रयत्न केला, परंतु कंपनीने तडजोड करण्यास नकार दिला.”

या कर्मचाऱ्याने पुढे असेही नमूद केले आहे की, त्यांच्या माजी बॉससह बहुतेक सहकाऱ्यांनी त्यांना खाजगीरित्या पाठिंबा दिला आणि कंपनीची भूमिका अवास्तव असल्याचे मान्य केले.

नोकरी सोडण्याचा निर्णय योग्य होता का?

दरम्यान भावाचे लग्न की नोकरी यातील एकाची निवड करताना या कर्मचाऱ्याने हातात कोणतीही नवीन ऑफर नसतानाही, कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने नमूद केले की, त्याला सध्या कोणतीही आर्थिक अडचण नव्हती, कारण त्याच्यावर कोणत्याही मोठ्या जबाबदाऱ्या नव्हत्या. तरीही त्याच्या मनात अजूनही सतत विचार चालू आहे की, आयुष्यात एकदाच येणाऱ्या कुटुंबाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी नोकरी सोडून देणे योग्य निर्णय होता का.