‘काँग्रेसच्या मोर्चामध्ये पाकिस्तानचा ध्वज फडकत आहे, हे पाहून तुम्हाला काहीच कसे वाटत नाही’, या ओळींसोबतच एक छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आले आहे. परंतु त्या छायाचित्रात काही तथ्य नाही. कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान भाजपशी निगडित समाजमाध्यमांवरील काही गटांनी काँग्रेसच्या सभेत पाकिस्तानी ध्वज फडकत असल्याचे छायाचित्र प्रसारित केले होते. हेच छायाचित्र पुन्हा नव्याने फेसबुकवर पसरविण्यात आले आहे. काँग्रेसच्या राजकीय मोर्चात काही लोक हे कार्य करीत असल्याचे म्हटले होते. निवडणूक काळातही भाजपच्या विचारांशी निगडित काही लोकांनी तसा प्रचार केला होता. उजव्या विचारसरणीच्या काही संघटनांनी पुन्हा तेच छायाचित्र समाजमाध्यमांवर टाकले आहे. परंतु राजकीय मोर्चात दिसणारा हा ध्वज पाकिस्तानचा नसून ‘इंडियन युनियन मुस्लीम लीग’ पक्षाचा आहे. १९४८ साली केरळमध्ये या पक्षाची स्थापना झाली. भारतीय निवडणूक आयोगाकडून या पक्षाला प्रादेशिक पक्षाचा दर्जा देण्यात आला होता. त्यामुळे पाकिस्तानी ध्वजाची बातमी पूर्णत: बनावट आहे.