Viral Video: आठवड्याची सुरुवात झाली की, आता पुन्हा सुट्टी कधी आहे याचा थेट आपण विचार करू लागतो. शनिवार, रविवार हे हक्काचे सुट्टीचे दिवस आपण फार मजेत आणि आनंदात घालवतो. पण, त्यानंतर सोमवारी ऑफिसला जाण्याचा कंटाळा आणि टेन्शनसुद्धा मनात हळूहळू घर करू लागतं. तर हे बघता, सुप्रसिद्ध उद्योगपती व महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा प्रत्येक सोमवारी एक मंडे मोटिव्हेशनचे व्हिडीओ किंवा काही पोस्ट शेअर करीत असतात. आज त्यांनी एका ब्लॉगरचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि या ब्लॉगरकडून आपण सर्वांनी काय प्रेरणा घेतली पाहिजे यांची यादी सांगितली आहे.

भारतातील प्रसिद्ध ‘ट्रक ड्रायव्हर ब्लॉगर’ राजेश रवानी हे आनंद महिंद्रा यांचे प्रेरणास्रोत ठरले आहेत. व्हायरल व्हिडीओत राजेश ट्रकचालक हैदराबादहून पाटण्याला जात असताना ट्रकमध्ये ‘देशी पद्धतीत चिकन’ बनविताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून आणि एकंदरीतच त्याचा हा प्रवास पाहून त्यांनी खास कॅप्शन लिहिली आहे आणि सर्वांना प्रेरणा घेण्यास सांगितले आहे. काय लिहिलं आहे या पोस्टमध्ये एकदा तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…VIDEO: गाय पक्की शिस्तीची! भाजीवाल्याकडे खाणं मागायला गेली अन् असं काही केलं की, तुम्हीही कराल कौतुक…

पोस्ट नक्की बघा…

तर या ट्रकचालकाचा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी रिपोस्ट करीत लिहिले, “२५ वर्षांहून अधिक काळ ट्रकचालक असलेल्या राजेश रवानी यांनी त्यांच्या ट्रकचालकाच्या व्यवसायात फूड ब्लॉगिंग जोडले. बघता बघता आता त्यांच्या यूट्युबवर १.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. तसेच आनंदाची गोष्ट अशी की, नुकतंच त्यांनी या कमाईतून नवीन घरसुद्धा घेतलं आहे. या सर्व गोष्टी बघता, त्यानं हे दाखवून दिलं आहे की, तुमचं वय कितीही असो किंवा तुमचा व्यवसाय कितीही छोटा असो; नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यास आणि स्वतःला पुन्हा नव्यानं तयार करण्यास कधीही उशीर झालेला नसतो. हा ट्रकचालक माझा #मंडे मोटिव्हेशन (#MondayMotivation) आहे’, अशी कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिली आहे.

सोशल मीडियावर ही पोस्ट आनंद महिंद्रा यांच्या अधिकृत @anandmahindra या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट पाहून ‘कौशल्य असणं गरजेचं आहे’, ‘ट्रकचालकास एक थार गिफ्ट करा’, ‘तुम्ही सामान्य माणसांचं कौतुक करता आहात हे पाहून बरं वाटलं’ आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत. एकंदरीतच तुमची मेहनत तुम्हाला तुमच्या स्वप्नांपर्यंत नक्कीच पोहोचवेल, असे आनंद महिंद्रानी सांगितले आहे.