तुम्हाला ‘द लायन किंग’मधील रफीकी आठवतो का? लाल आणि निळ्या नाकाचा, मोठ्या दाढीचा… माकडांची ही प्रजाती आहे ती मँड्रिल नावाची. हे पृथ्वीवरील सर्वात आकर्षक आणि बुद्धिमान असे प्राणी आहेत. आतापर्यंत त्यांची अनेक रूपं टिपली गेली आहेत. मात्र, त्यांचं एक रूप आतापर्यंत कुणाच्याही नजरेत आलेलं नाही ते म्हणजे ही माकडे जेव्हा भावनिकदृष्ट्या उत्तेजित होतात किंवा रागावतात तेव्हा ती निळ्या रंगाची दिसतात.
शिवाय यांच्यापैकी काही माकडे राग आल्यावर लालसर रंगाची दिसतात. या जातीच्या माकडांची रचनाच अशी आहे की ते उत्तेजित झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर किंवा शरीराच्या विशिष्ट भागावर चमकदार निळा रंग येतो.
हे बदल नर माकडांमध्ये अधिक स्पष्टपणे दिसून येतात. त्यांचा हा निळेपणा टेस्टोस्टेरॉनच्या पातळीशी संबंधित असतो. मँड्रिल माकडे जितकी निळी होतात. तितका त्यांचा बांधा अधिक मजबूत मानला जातो.
त्यांच्यातील या बदलाचा वापर मँड्रिल अनेकदा वर्चस्व गाजवण्यासाठी, त्यांचा प्रदेश दाखवण्यासाठी आणि संकटांशी लढण्यासाठी करतात. ते अनेकदा मोठ्या गटात आढळतात. शिवाय जोडीदार निवडतानाही ते या वैशिष्ट्याचा वापर करतात. नर मँड्रिल एखाद्या मादीला आकर्षित करण्यासाठी त्याचा तेजस्वी निळा रंग प्रदर्शित करतो.
मँड्रिल हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासलेल्या इतर कोणत्याही माकडांपेक्षा मोठे, अधिक सामाजिक आणि रंगीबेरंगी आहेत. असं असतानाही त्यांच्या अधिवासाच्या होणाऱ्या नुकसानामुळे आणि शिकारीमुळे ही माकडे सध्या असुरक्षित प्रजातींच्या यादीत समाविष्ट आहेत.
मँड्रिल हा आफ्रिकेतील एक मोठा, रंगीबेरंगी सस्तन प्राणी आहे. हा पश्चिम मध्य आफ्रिकेत आढळतो आणि उष्ट कटिबंधीय प्रदेशात राहतो. मँड्रिलच्या निवासस्थानाचा नाश होत असल्याने त्यांची संख्या कमी होत चालली आहे. त्यांच्या संवर्धनासाठी विविध एनजीओ आणि स्थानिक सरकार एकत्रितपणे काम करत आहे.