अनेक महाराष्ट्रीय घरांमध्ये सकाळचा नाश्ता म्हणजे कांदे-पोहे आणि त्याच्या जोडीला गरमागरम आल्याचा चहा, असा ठरलेला बेत असतो. मोहरी, कढीपत्त्याची खमंग फोडणी, मंद आचेवर शिजविलेला कांदा, शेंगदाणे आणि पोहे शिजल्यानंतर बारीक चिरून घातलेली कोथिंबीर… अशा या अतिशय चविष्ट कांदे-पोह्यांच्या चवीला तोडच नाही.

आपल्यासारखा नाश्ता किंवा नाश्त्याचे पदार्थ तसे पाहायला गेलो, तर विदेशांत शक्यतो नसतात. ब्रेड, सरबत, फळे, अंडी असे काही निवडक पदार्थ त्यांच्या ‘ब्रेकफास्ट टेबल’वर आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर एका फॉरेनर तरुणाने, महाराष्ट्रीय पद्धतीचे कांदे-पोहे बनविल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अगदी आपल्या घरी जसे कांदे-पोहे तयार होतात, अगदी त्याच पद्धतीने त्या तरुणाने कांदे-पोहे बनविल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. त्याने दाखविलेली ही रेसिपी पाहून नेटकरीसुद्धा एकदम चकित झाल्याचे त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांतून पाहायला मिळते. आता व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये नेमके काय आहे ते पाहू.

हेही वाचा : बोली असो वा प्रमाण, मराठी भाषेची गोडी तुमच्या मुलांना कशी लावाल? ‘खलबत्ताशी’ खास बातचीत…

सुरवातीला तो तरुण कांदे-पोहे बनवीत असून, त्यासाठी ‘थिक फ्लॅट राईस’ म्हणजेच आपले जाडे पोहे वापरत असल्याचे तो सांगतो. त्यानंतर पोह्यांना चाळून १५-२० सेकंदांसाठी पाण्याखाली धुऊन घ्या, असे म्हणतो. नंतर कांदा, हिरव्या मिरच्या व कोथिंबीर बारीक चिरून घेतो. एका ताटलीमध्ये हळद, शेंगदाणे आणि चिरलेले साहित्य ठेवतो. आता या तरुणाने पॅनमध्ये तेल गरम करून, प्रथम शेंगदाणे परतून बाजूला ठेवले. नंतर मोहरी, जिरे, कढीपत्ता, मिरची, हळद घालून छान फोडणी दिली. त्यामध्ये कांदा, पोहे घालून ते शिजवून घेतले. सर्वांत शेवटी परतलेले शेंगदाणे, मीठ आणि विशेष म्हणजे चवीला साखर घालून, वरून कोथिंबीर घालून घेतली. अशा अगदी पद्धतशीरपणे या तरुणाने कांदे-पोहे बनविलेले आपण पाहू शकतो.

इतकेच नाही, तर गरमागरम पोहे स्टीलच्या ताटलीत खाण्यासाठी काढून, त्यावर शेव आणि मस्त लिंबूसुद्धा पिळून घेतले आहे. ही रेसिपी आणि पदार्थ बनविण्याची पद्धत पाहून नेटकरी मात्र चांगलेच अवाक आणि खुश झाले आहेत. त्यांनी या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहा.

हेही वाचा : Amazon वरून मागवलेला आयफोन निघाला नकली! व्हायरल पोस्टवर नेटकरी म्हणाले, “म्हणूनच अशा….”

“आम्हाला मुलगा पसंत आहे”, असे एकाने लिहिले आहे. “एक नंबर भावा!”, असे दुसऱ्याने लिहिले आहे. “महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरी कांदे-पोहे किमान आठवड्यातून दोन-तीन वेळा खाल्ले जातात. असे पोहे म्हणजे आईच्या हातची खासियत असते. त्यामुळे हा पदार्थ आमच्यासाठी खूपच विशेष आहे. हा व्हिडीओ पाहून मला प्रचंड आनंद झाला. खरंच तुला खूप आशीर्वाद”, असे तिसऱ्याने लिहिले आहे. “वाह! शेंगदाणे आणि साखर घातल्याबद्दल रेसिपीला ५०० गुण!”, असे चौथ्याने म्हटले आहे. तर शेवटी पाचव्याने, “चला, आता पटकन याला आधार कार्ड देऊन टाका”, असे गमतीने लिहिले आहे.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @plantfuture नावाच्या अकाउंटद्वारे हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १.२ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत.