सापाचं नुसतं नाव जरी काढलं तरी आपली भांबेरी उडते. जर खरंच विषारी साप तुमच्या समोर आला तर तुम्ही काय करणार? तुम्ही नक्कीच घाबरून जाल. मात्र एका वनरक्षकाने आपली जीव धोक्यात घालून एका विषारी सापाचे प्राण वाचवल्याचं समोर आलंय. विषारी सापाला वाचवल्यानंतर या वनरक्षकाने समस्त गावकऱ्यांसमोर आपले मोलाचे शब्द मांडले. या वनरक्षकाच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या वनरक्षकाचं हे भाषण ऐकून सापाकडे पाहण्याचा तुमचा सुद्धा दृष्टीकोन बदलेल हे मात्र नक्की.

एखाद्याच्या घरात साप दिसला की, आठ दहा जण हातात लाठ्या काठ्या घेऊन सापाला ठेचून मारतात. साप दिसला रे दिसला की आपण सगळे अगदी घाबरून जाऊन, जीवाच्या आकांताने त्याला ठार मारण्यासाठी धावतो. बिहारच्या किशनगंजच्या फरिंगोला गावात विषारी साप आढळून आला होता. आतापर्यंत आपण जे करत आलो आहोत, तेच यंदाही लोकांचे तेच प्रयत्न झाले असते. बँडेड क्रेट जातीचा हा साप असून अत्यंत विषारी असल्याचं सांगण्यात येतं. या सापाने कुणाला दंश केला असता तर त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू होण्याची शक्यता होती. पण तिथले वनरक्षक अनिल कुमार यांनी आपला जीव धोक्यात घालून या सापाला वाचवलं. इथल्या गावकऱ्यांनी कदाचित या सापाला ठेचून मारून टाकलं असतं. पण गावकऱ्यांपासून या वनरक्षकाने सापाची सुटका केली.

वनरक्षक अनिल कुमारने या विषारी सापाला शांत करून एका पिशवीत टाकलं. त्यानंतर त्यांनी सापाला कोणतीही इजा न केल्याबद्दल गावकऱ्यांचे आभार मानण्यासाठी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांचे शब्द ऐकून सापाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोनच बदलून जाईल. यावेळी त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक प्राण्याची स्वतःची भूमिका कशी असते हे सांगितलं. तसंच इतर कोणत्याही प्राण्याला सामोरे गेल्यानंतर कोणताही उतावीळपणाने निर्णय घेऊ नका, अशी विनंतीच त्यांनी गावकऱ्यांना केलीय.

बचाव केलेल्या सापाचा फोटो:

साप हा अन्नसाखळीमधील एक महत्त्वाचा घटक आहे. तसंच तो शेतकऱ्यांचा मित्र म्हणून काम करत असतो. साप वाचवणे हा काळाची गरज आहे. जंगलतोड आणि वाढत्या शहरीकरणामुळे सापांना रहायला जागा मिळत नाही. खायला अन्न मिळत नाही. म्हणून अन्नाच्या शोधात हा साप लोकांच्या घरात आला असेल. त्यांना ठेचून मारण्याऐवजी सुखरूप जंगलात सोडून त्यांना जीवनदान दिलं पाहिजे, असं या व्हिडीओमध्ये वनरक्षक अनिल कुमार बोलाताना दिसून येत आहेत. एकदा हा व्हिडीओ नक्की पाहा.

सध्या या वनरक्षकाच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी जंगलातील आगीसारखा पसरू लागला आहेत. या वनरक्षकाचं सोशल मीडियावर कौतुक करण्याय येतंय. तर काहींनी भविष्यात कोणतीही दुर्दैवी घटना टाळण्यासाठी ग्रामस्थांमध्ये अशी जनजागृती कशी करावी याबद्दल कमेंट्स केल्या आहेत.

आयएएस अधिकारी दीपक कुमार सिंग यांनी या वनरक्षकाच्या भाषणाचा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. केवळ दोन दिवसात या व्हिडीओला सात हजार लोकांनी पाहिलंय. तसंच हा व्हिडीओ रिट्वीट करत नेटिधन्स लोकांमध्ये सापांबाबत जनजागृती पसरवताना दिसून येत आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यात साप खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळेच त्याला जगवणं आपलं कर्तव्य आहे, अशा प्रतिक्रिया काही नेटिझन्स देत आहेत.