भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे पंजाब विद्यापीठाला स्वत:जवळ असणारा साडेतीन हजार पुस्तकांचा खजिना दान करणार आहे. ही ‘वैचारिक संपत्ती’ दान करण्याची इच्छा त्यांनी नुकतीच विद्यापीठाला दिलेल्या भेटीदरम्यान बोलून दाखवली आहे. १९५० च्या काळात सिंग यांनी याच विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे.
अनेकजण विद्यापाठीला आर्थिक साहाय्य देऊ करतात. या पैशांचा योग्य प्रकारे वापर होतोच असं नाही. पण, आपल्याजवळ असणारी महत्त्वाची पुस्तकं दान करून मनमोहन सिंग यांनी नवा पायंडा घातला आहे. मनमोहन सिंग यांच्याकडे जगभरातील दुर्मिळ तसेच अनेक माहितीपर पुस्तकांचा संग्रह आहे. यातील साडेतीन हजार पुस्तकं दान करण्याची इच्छा त्यांनी भेटीदरम्यान व्यक्त केली. विद्यापीठाच्या ग्रंथालयात यासाठी खास जागा तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर ही पुस्तकं मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानावरून विद्यापीठात आणली जाणार असल्याची माहिती ‘इंडिया टुडे’नं दिली आहे. याचसोबत काही निवडक छायाचित्र आणि चित्रंही मनमोहन सिंग दान करणार आहेत.