Four Rajasthan students hire helicopter to reach exam centre : उत्तर भारतात उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि खराब हवामानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ढगफुटी आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे डोंगराळ भाग असलेल्या राज्यांमध्ये तर परिस्थिती आणखीच बिकट झाल्याचे चित्र आहे. पंजाबच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पुराची अत्यंत गंभीर स्थिती पाहायला मिळत आहे. यादरम्यान राजस्थानमधील चार विद्यार्थ्यांनी या सर्व अडचणींवर मात करत थेट हेलिकॉप्टरमधून उत्तराखंड येथील परीक्ष सेंटर गाठल्याचा प्रकार समोर आला आहे.
हे सर्व विद्यार्थी बी.एडचे विद्यार्थी आहेत आणि त्यांचे परीक्षेचे केंद्र हे मुनसियारी येथे आले होते. मात्र अनेक ठिकाणी भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे रस्ते आडवले गेल्याने त्यांना वेळेवर परीक्षेसाठी पोहचणे शक्य नव्हते. हे सर्व विद्यार्थी उत्तराखंड मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना मुनसियारी येथील आरएस टोलिया पीजी कॉलेज येथे परीक्षेसाठी रिपोर्ट करायचे होते, असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. यामुळे ते ३१ ऑगस्ट रोजी हल्द्वानी येथे पोहचले.
उत्तराखंड मुक्त विद्यापीठाच्या बी.एड परीक्षेचे प्रभारी सोमेश कुमार यांनी सांगितलं की हे परीक्षा केंद्र या उमेदवारांनी स्वतःहून निवडले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थी राजस्थानच्या बालोत्रा शहरातील रहिवासी आहेत आणि यांना हेलिकॉप्टर सेवेबद्दल माहिती मिळाली. “आम्ही ३१ ऑगस्टला हल्द्वानी येथे पोहोचलो, तेव्हा आम्हाला कळले की भूस्खलनामुळे मुनसियारीकडे जाणारे सर्व रस्ते बंद आहेत.आम्ही परीक्षा देऊ शकणार नाही असे आम्हाला वाटले,” असे ओमरराम जाट नावाच्या एका विद्यार्थ्याने पीटीआयला सांगितले.
जाटने पुढे सांगितले की त्यांना नंतर हेलिकॉप्टर सेवा पुरवणाऱ्या कंपनीबद्दल समजले, ही कंपनी हल्द्वानी आणि मुनसियारी दरम्यान सेवा पुरवते. त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसल्याने त्यांनी हेरिटेज एव्हिएशनच्या सीईओशी संपर्क साधला.
विद्यार्थ्यांनी सांगितले की त्यांनी हेरिटेज एव्हिएशनच्या सीईओशी बोलून त्यांना हेलिकॉप्टरने परीक्षा केंद्रावर पोहचवावे अशी विनंती केली. “त्यानंतर आम्ही हेरिटेज एव्हिएशनच्या सीईओशी बोललो. आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला हल्द्वानीहून मुनसियारीला घेऊन जावे. आम्ही त्यांना सांगितले की, जर आम्ही परीक्षा केंद्रावर पोहोचलो नाही, तर आमचे एक वर्ष वाया जाईल.”
यानंतर कंपनीने दोन पायलट आणि एक हेलिकॉप्टर दिले ज्याच्या माध्यमातून विद्यार्थी मुनसियारी येथे सुरक्षितपणे पोहचले आणि त्यांना पुन्हा हल्द्वानी येथे परत देखील आणण्यात आले. “हेलिकॉप्टर प्रवासाचे वन-वे भाडे ५,२०० रुपये होते,” असेही त्यांनी सांगितले. इतर तीन विद्यार्थी मंगाराम जाट, प्रकाश गोदरा जाट आणि नरपत कुमार आहेत.