निवडणुका म्हटल्यावर प्रचारसभा आल्याच आणि प्रचारसभा म्हटल्यावर कार्यकर्ते आले. अनेकदा सभांमध्ये असलेले अतीउत्साही कार्यकर्ते हे नेत्यांच्या उत्साह वाढवतात, पण कधीकधी हेच कार्यकर्ते उत्साहाच्या भरात आपल्या नेत्याला गोंधळात टाकतात. असंच काहीसं झालं आकोल्यामधील जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील वाडेगाव येथील राष्ट्रवादीच्या सभेमध्ये.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे आयोजित सभेत बुधवारी शरद पवार उपस्थित होते. पवार सभेच्या ठिकाणी आले तेव्हा मोठा पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. ‘शरदचंद्र पवारसाहेब तुम आगे बढो… हम तुम्हारे साथ है’ या घोषणांमध्ये पवार यांचा मोठा पुष्पहार घालून मंचावर सत्कार करण्यात आला. मात्र पवारांना मोठ्या आकाराचा पृष्पहार घालण्यासाठी तो कार्यकर्त्यांनी उचलून पवारांना घातला. पवारांनाही दोन्ही हाताने तो हार पकडला. त्याचवेळी पवारांच्या उजव्या बगलेखालून मंचावर पवारांच्या मागे बसलेला कार्यकर्ता डोकावला. या कार्यकर्त्याने समोर कोणाला तरी हात दाखवला. आपल्या बगलेखालून कोणीतरी डोकावत असल्याचे समजल्यानंतर पवारांनी ढोपरानेच या कार्यकर्त्याला बगल दिली. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या सभेमध्ये व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या काही नेत्यांनी पवारांच्या वयाचा उल्लेख केला. आपल्या भाषणामध्ये पवारांनी या नेत्यांची चांगलीच फिरकी घेतली. ‘अभी तो मैं जवान हू’ असं सांगत पवारांनी ‘सर्वांना घरी पाठवूनच मी घरी जाणार आहे. माझ्या वयाबद्दल बोलू नका, मी तुमच्या पक्षाचा अध्यक्ष आहे लक्षात ठेवा’ असा मजेदार टोलाही स्वपक्षीय नेत्यांना लगावला. वयाच्या ७८ व्या वर्षीही पवार निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासूनच राज्यभर फिरत असल्याबद्दल या सभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचे कौतुक केले.