Viral video: गणेशोत्सव म्हंटलं की डोळ्यासमोर शक्तीतुरा नृत्य व जुने जाखडी नृत्य उभे राहते. या कलेशिवाय गणेशोत्सव पू्र्ण होऊ शकत नाही. अशाच मुंबईहून गावी जाणाऱ्या चाकरमान्यांनी थेट दिवा रेल्वे स्टेशनवरच पारंपारिक नृत्य सादर करायला सुरुवात केली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हीही कौतुक कराल.
कोकणाच्या लोककलेतील शक्तीतुरा ही लोककला फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या लोककलेमध्ये नमन, दशावतार, भारूड, गोंधळ, जाखडी, वाघ्या मुरळी, तमाशा अशा अनेक प्रकारच्या लोककला जोपासल्या जातात. त्यांचे सादरीकरण केले जाते. या सर्व लोककला सण उत्सवामध्ये साजरा केल्या जातात. सर्व लोककलावंत आजही या लोककला जपण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.गणेशोत्सव जसा सुरू होतो तसाच शक्तीतुरा आणि जाखडी नृत्य याच दिवसांमध्ये सुरू होते. शक्तीतुरा नृत्यप्रकार गणपती उत्सवापासून अगदी नवरात्रीपर्यंतसुद्धा मोठ्या प्रमाणात सादर केला जातो; मात्र खरी मजा ही गणेशोत्सवामध्येच येते. दरवर्षी मुंबईतून येणारे चाकरमानी या कलेचा आस्वाद घेत असतात.प्रत्येक गावागावांमध्ये “गणा धाव रे ..मना पावरे ..तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे”, म्हणत पायात चाळ बांधून ढोलकीच्या आणि बेंजोच्या संगीतमय तालावर चाकरमानी व लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी याचा आनंद घेतात.
या व्हिडीओमध्येही तुम्ही पाहू शकता, अगदी लहान चिमुकल्यांपासून, तरुण आणि वृद्धही पारंपारिक नृत्य करताना दिसत आहेत. कोकणात जाण्यासाठी प्रचंड गर्दी दिसत आहे आणि याच गर्दीत चाकरमान्यांना नाचण्याचा मोह आवरला नाहीये.
पाहा व्हिडीओ
अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. दिवा स्थानक, लोकमान्य टिळक टर्मिनसवर गावाला जाण्यासाठी चाकरमान्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. गणेशोत्सवासाठी स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. मात्र चाकरमान्यांचीही तितकीच गर्दी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे एसटी आणि खासगी बसेसनाही प्रचंड गर्दी झाल्याने चाकरमान्यांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. कुटुंबकबिल्यासह गावाकडे जायला निघालेल्या चाकरमान्यांची ऐनवेळी चांगलीच तारांबळ उडाली आहे. यातच प्रवाशांनी आपला आनंद शोधला आहे.