Gen Z Employee Viral Video: वर्क लाइफ बॅलन्स, टॉक्सिक वर्क कल्चर.. असे शब्द आता कॉर्पोरेट प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये सर्रास ऐकायला मिळतात. सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून याची जोरदार चर्चा होते. अनेकांची यावर वेगवेगळी मते आहेत. ठरलेल्या कामाच्या वेळेपेक्षा अधिक वेळ थांबून काम करण्यास काही लोक विरोध करतात तर काही जणांना यश मिळविण्यासाठी अधिक काम करणे पसंत आहे. सध्या या विषयाची पुन्हा चर्चा होण्याचे कारण म्हणजे ‘जेन झी’ याबद्दल काय विचार करतात? त्यांना अधिक वेळ काम करणे मंजूर आहे की नाही? एका व्हायरल व्हिडीओमुळे हा वाद पुन्हा सुरू झाला आहे.
इन्स्टाग्राम युजर सताक्षी पांडे नामक युवतीने नोकरीबद्दलचे तिचे विचार एका व्हिडीओतून शेअर केले. त्यानंतर या विषयाची चर्चा होऊ लागली आहे. तिने स्वतःच्या नोकरीचा अनुभव सांगत असताना जेन एक्स आणि वाय यांना ‘ज्ञान’ दिले आहे. आधीच्या पिढीला बोल लावल्यामुळे सताक्षी स्वतः जेन झीची असल्याची चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये सताक्षी कामावरून घरी जाताना दिसत आहे. ती म्हणते, “मी आता ऑफिसमधून घरी चालले आहे. माझ्या मॅनेजरने सांगितले होते की, आणखी थोडे काम आहे. थोडा वेळ थांबून करून दे. मी त्यांना सरळ सांगितले की, नाही सर मला वेळेवल निघायचे आहे.”
यानंतर स्वतःची बाजू सांगताना सताक्षी म्हणाली की, मी काही लवकर निघत नव्हते. तर मी माझ्या ठरलेल्या वेळेवर घरी जात आहे. “मी माझ्या कामाचे ठरलेले तास पूर्ण करून जात आहे. कारण आज माझा उपवास आहे”, असे कारण सताक्षीने दिले.
सताक्षीला थोडावेळ कामासाठी थांबवत असताना तिच्या मॅनेजरने स्वतःचे उदाहरण दिले होते. हे उदाहरणही तिने आपल्या व्हिडीओत सांगितले. ती म्हणाली, “माझा मॅनेजर म्हणाला, तुला माहितीये का, मी काल रात्रभर ट्रेनमध्ये होतो. सकाळी सात वाजता पोहोचलो. तिथून लगेच ७.३० वाजता ऑफिस गाठले आणि आता ६.३० वाजले तरी मी ऑफिसमध्येच आहे.”
कामावरून काढले तरी काही फरक पडत नाही
मॅनेजरच्या उदाहरणावर टीका करताना सताक्षी म्हणाली की, तुम्ही कामासाठी इतका वेळ दिला, ठिक आहे. तुम्हीही घरी जाऊ शकता. यानंतर सताक्षीने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. माणूस दोन वेळच्या अन्नासाठी काम करतो. जर हे अन्न तो शांतपणे खाऊ शकत नसेल तर या कामाचा काय उपयोग आहे? सताक्षीने अधिक वेळ काम करत राहण्याची संकल्पना फेटाळून लावली आहे. तसेच मला कामावरून काढून टाकले तरी काही फरक पडत नाही, असेही म्हटले.
सताक्षी पांडेचा व्हिडीओला इन्स्टाग्रामवर चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. या व्हिडीओला तीस लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो कमेंट्स आल्या आहेत. अनेकांनी तिच्या बाजूने प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तिच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी तिचा विरोधही केला आहे.
एका युजरने म्हटले, तुमचे काम कामांच्या तासावर नाही तर खऱ्याखुऱ्या कामावर ठरते. वरिष्ठांची भूमिका कामाचे ठरलेले तास पूर्ण करणे नसते तर त्यांच्यावरील जबाबदारी पूर्ण करणे असते. दुसऱ्या एका युजरने म्हटले की, तुमचा मुद्दा बरोबर आहे. पण स्पर्धेच्या या युगात तुम्ही हे काम नाही केले तर दुसरा कुणीतरी करेल.