एका तरुणीनं कॅब चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ लखनऊ शहरातील अवध क्रॉसिंगजवळचा आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर #ArrestLucknowGirl हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहे. सर्वात आधी हा व्हिडिओ ट्विटर वर Megh Updates नावाच्या एका हँडलवरून शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला असून तरुणीला अटक करण्याची मागणी केली आहे.

या व्हिडिओत एक तरुणी भररस्त्यात कॅब चालकाला मारहाण करताना दिसत आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. या चालकानं तिला धडक दिल्याचं ही तरुणी ओरडून सांगत आहे. दरम्यान, हा गोंधळ सुरू असताना एक वाहतूक पोलीस तिथं येतो आणि मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तरीही ती त्या चालकाला मारणं थांबवत नाही. शिवाय त्याचा फोनही तोडून टाकते. ही मुलगी उद्धट आहे, असं अनेकजण म्हणत असल्याचं या व्हिडिओत ऐकू येत आहे. तसंच “एवढा वेळ जर एखादा मुलगा मुलीला मारत असता तर लोकांनी काय केलं असतं.” असा प्रश्नही काही जण विचारत आहेत.

हा व्हिडिओ गर्दीत उभ्या असलेल्या एका व्यक्तीने रेकॉर्ड केला आहे. “कोणीतरी महिला पोलिसांना बोलवा,” अशी विनवणी हा कॅब ड्रायव्हर करत आहे. याचवेळी एका व्यक्तीने मधे येऊन या मुलीला थांबवण्याचा प्रयत्न केला तर तिने त्या व्यक्तीलादेखील मारहाण केली.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत या तरुणीला अटक करण्याची मागणी केली आहे. काही नेटकऱ्यांनी केंद्रीय मंत्र्यांना टॅग करून या तरुणीविरोधात कारवाई करा, असं म्हटलं आहे. तर, हा व्हिडिओ शेअर करत “हेच स्त्री सक्षमीकरण आहे का?” असा सवालही काहींनी केला आहे. “या तरुणीने भररस्त्यात केलेल्या कृत्याचं कोणीच समर्थन करणार नाही. ती पूर्णपणे चुकीची वागली आहे. मध्यस्थी करणाऱ्यालाही तिने मारहाण केली आहे, ही तरुणीच आरोपी आहे,” असं एका युजरने म्हटलं आहे.