Girlfriend Killed Boyfriend By Cobra Bite : उत्तराखंडच्या हल्दानी जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीने प्रियकराच्या पायावर नाग सोडून त्याची हत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अंकित चौहान असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. अंकित हलद्वानी परिसरात व्यापार करायचा. पोलिसांनी अंकितचा मृतदेह सापडल्यावर माहिती दिली होती की, अंकितचा मृत्यू कारमध्ये श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाल्याने झाला. मात्र, अंकितच्या कुटुंबियांनी हे मान्य केलं नव्हतं. अंकितची हत्या झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केला होता. त्यानंतर पु्न्हा पोलिसांनी तपास सुरु केला आणि अंकितच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपी गारुडी आणि माहीसह तिच्या नवीन प्रियकराला नैनीताल पोलिसांनी (तिघांना) अटक केली.

नैनीतालचे एसएसपी पंकज भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्याकांडमध्ये एका महिलेसह पाच जणांचा समावेश आहे. या महिलेचं नाव डॉली उर्फ माही आहे. या महिलेनं हत्येचा संपूर्ण कट रचला होता. शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं की, अंकितचा मृत्यू साप चावल्याने झाला आहे. त्यानंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती उघडकीस आली.

आरोपी महिलेनं केला गारुड्याला संपर्क

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिला नवीन प्रियकरासोबत राहत होती. प्रेयसीचं असं वागणं अंकितला आवडलं नाही. तिने अंकितच्या हत्येचा कट रचला होता. त्यानंतर या महिलेनं नवीन प्रियकरासह गारुड्याची मदत घेतली. अंकितला या महिलेनं रुममध्ये बोलावून त्याच्या दिलेल्या मद्यात बेशुद्धीचं औषध टाकलं. दारुचं सेवन केल्यानंतर अंकित बेशुद्ध झाला. माहिने अंकितच्या पायांवर गारुड्याच्या मदतीने साप सोडला. त्यानंतर नाग त्याला चावला आणि अंकितला कारमध्ये सोडून आरोपी त्याठिकाणाहून निघून गेले.

एसएसपी पंकज भट्ट यांनी सांगितलं की, अंकित चौहानचं माहिशी संबंध होते. माही अंकितला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत होती. नवीन प्रियकर मिळाल्यानंतर माहिला अंकितपासून सुटका करायची होती. परंतु, अंकितला तिच्याशी प्रेमसंबंध ठेवायचे होते. हे राज्यातील पहिलं प्रकरण आहे. ज्यामध्ये सापाचा वापर करून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपी गारुडी आणि माहीसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.