Gold Rate Today 9 September: भारतात पहिल्यांदाच सोन्याने प्रति ग्रॅम १.१० लाख रूपयांचा टप्पा पार केला आहे. आज, मंगळवार ९ सप्टेंबर रोजी भारतात सोन्याच्या किमती उच्चांकावर पोहोचल्या. अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची मागणी आणि डॉलरच्या घसरणीमुळे मौल्यवान धातूची मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या भावात वाढ पाहायला मिळत आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच एमसीएक्सवर सोन्याने नवा विक्रम केला आहे. मंगळवारी ९ सप्टेंबर रोजी २४ कॅरेट सोन्याने प्रति १० ग्रॅम १ लाख १० हजारांचा टप्पा पार केला. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आली. आज ते ०.३२ टक्क्यांच्या वाढीसह प्रति औंस ३६४८.०८ डॉलर्सवर व्यवहार करताना दिसत आहे.

मंगळवारी सकाळी ९.१५ वाजता एमसीएक्सवर सोन्याचा ऑक्टोबर फ्युचर्सचा दर प्रति १० ग्रॅम १,०८,७५४ रूपये होता. म्हणजेच दरात ०.२२ टक्के एवढी वाढ झाली आहे. त्यानंतर तो आणखी वाढला. परिणामी ०.५९ टक्क्यांनी वाढून दर १,०९,१६२ रूपये झाला. सोन्याच्या दरात ६०० रूपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. तसंच चांदीचा दर जवळपास २२३ रूपयांनी वाढून १,२५,७९४ रूपये प्रति किलो झाला आहे.

सोन्याच्या किमतीत वाढ होण्यामागे अनेक कारणे आहेत. यामध्ये वाढती मागणी, डॉलरची घसरण आणि येत्या आठवड्यात यूएस फेड रिझर्व्हकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता यांचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिका-चीन टॅरिफ आणि भू-राजकीय तणावामुळे अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे लोक सोन्यावर सट्टा लावण्याला आणि गुंतवणुकीस प्राधान्य देत आहेत. दुसरीकडे डॉलरच्या कमकुवतपणामुळे सोन्याला आधार मिळाला आहे.

गुंतवणूकदारांना चांगला परतावा

सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याने गुंतवणूकदारांना या वर्षात चांगला परतावा मिळाला आहे. यावर्षी आतापर्यंत देशांतर्गत स्पॉट गोल्डमध्ये सुमारे ४२ टक्के वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम सुमारे ७६ हजार होता. ८ सप्टेंबर रोजी तो १ लाख ८ हजार वर पोहोचला.