viral Video: आजी-आजोबांसाठी नातवंडं म्हणजे दुधावरची साय. आई-बाबांनंतर कोणी त्यांची जागा घेऊ शकेल तर ते आजी-आजोबाच असतात. बाळाचं आजारपण, आई-बाबांचे ऑफिस, तर कामानिमित्त अचानक बाहेर जायला लागणे आदी अनेक गरजेच्या वेळी आजी-आजोबा, आई-बाबांना आधार देऊन जातात. त्यामुळेच या नातवंडांनादेखील आजी-आजोबांबद्दल तितकाच आदर आणि प्रेम असते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आजोबा नातीचे फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न करताना दिसून आले आहेत.

मिनाहिल असे या तरुणीचे नाव आहे. नात तिच्या आजोबांना तिचे काही फोटो काढण्याची विनंती वा हट्ट करते. स्मार्टफोन वापरायची सवय व स्मार्टफोनच्या कॅमेराशी परिचित नसल्यामुळे आजोबा नातीला ‘हे बटण क्लिक करायचे आहे का?’ असे गोंधळून व उत्सुकतेनं विचारतात. त्यानंतर नात त्यांना मध्ये-मध्ये मार्गदर्शन देत असते. एकदा पाहाच फोटोग्राफर आजोबा आणि पोझ देणाऱ्या नातीचा हा व्हायरल व्हिडीओ.

हेही वाचा…घड्याळात वेळ पाहण्यासाठी नाही घ्यावी लागणार मेहनत ; ‘हा’ खास जॅकेट करणार तुमची मदत

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, आजोबांच्या लक्षात येतं की, फ्रंट कॅमेरा चालू आहे. ‘हा तर माझा चेहरा दिसतोय’ असे गोंधळून ते म्हणतात. तेव्हा नात फोटो कॅप्चर करण्यास बॅक कॅमेराकडे स्विच करते. आजोबांची नात फोटो क्लिक करून घेण्यासाठी एका कठड्यावर बसते. तसेच यादरम्यान आजोबा नातीला फोटोसाठी पोझ कसे द्यायचे याचे मार्गदर्शन करतात. नातीला जवळच्या फुलांना हळूवारपणे स्पर्श करून पोझ देण्यास सांगतात आणि झाडांच्या काट्यांपासून सावध राहण्याचाही सल्ला देतात.

व्हिडीओचा शेवट आजोबा आणि नातीच्या हृदयस्पर्शी सेल्फीसह होतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @minahilhuma या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि ‘मला असे जीवन आवडते, कृपया आजोबांच्या दीर्घ व निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करा, कारण ते माझ्यासाठी सर्वकाही आहेत’; अशी कॅप्शन तिने व्हिडीओला दिली आहे.