‘नवीन वर्षाला आपण बारीक होणारच’ या फक्त दोन दिवस टिकणाऱ्या न्यू ई्अरच्या निश्चयाला फक्त सुरूंगच नाहीत तर तो जमीनदोस्त करणारी बातमी आम्ही तुम्हाला देणार आहोत फोटोमधला बर्गर पाहा.

मेहेरबान कदरदान, सादर आहे, बर्गरांचा बर्गर, महाराजा बर्गर, ‘हार्ट अटॅक बर्गर’!

होय! या बर्गरचं नाव ‘हार्ट अटॅक बर्गर’. हा बर्गर खाऊन ‘हार्ट अटॅक’ य़ेत नाही. पण या बर्गरची साईझ पाहूनच छाती दडपून जाते म्हणून त्या बर्गरला ‘हार्ट अटॅक बर्गर’ असं म्हणतात.

बघा ना मॅकडोनाल्ड्सच्या महाराजांच्या बर्गरपेक्षा मोठा हा बर्गर आहे. तो महाराजा मॅक बर्गर खाताना (आधी तो हातात पकडताना) कितीतरी तारांबळ उडते. तर मग हा बर्गर खाताना काय होईल ते हा बर्गर खाल्ल्यावरच सांगता येईल.

‘रोडिओ ड्राईव्ह’ य़ा अमेरिकन फास्टफूड चेनने भारतात पाय ठेवल्यावर हा बर्गर्सचा पिता भारतात आणला आहे. अंधेरीतल्या त्यांच्या दुकानामध्ये हा बर्गर ठेवला आहे. या हार्ट अटॅक बर्गरमध्ये डबल मीट पॅटी, चीज्, सॅलड असा भरपूर जामानिमा आहे. आणि एक माणूस संपवू शकेल असा हा बर्गर निश्चितच नाही.

कोणतीही नवीन फास्ट फूड चेन भारतात आली की त्यांच्याकडून डिस्काऊंटची खैरात केली जाते. या बर्गरच्या बाबतीतही असंच झालं आहे. ‘रोडिओ ड्राईव्ह’ने त्यांचा हा ९०० रूपयांचा बर्गर पहिल्या आठवड्यात ‘पे बाय वेट’ने ठेवला आहे. म्हणजेच पहिला आठवडा या ‘रोडिओ ड्राईव्ह’ मध्ये तुम्ही तुमच्या वजनाइतके पेसे देत हा बर्गर खाऊ शकता (जमला तर). म्हणजे तुमचं वजन जर ८० किलो असेल तर तुम्हाला या बर्गरचे फक्त ८० रूपये द्यावे लागणार आहेत.
या भयानक मोठ्या बर्गरची कल्पना पाहूनच मुंबईतल्या खाद्याप्रेमींच्या यावर उड्या पडणार आहेत हे निश्चित आहे.