Viral video: ‘श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी अन् लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी’ असं म्हटलं जातं. बाप-लेकीचं नातं वेगळं सांगायची गरज नाही. जगातील कुठल्याच नात्यात जेवढी ओढ नसते तेवढी बाप-लेकीत असते. बाबा हा आपल्या मुलीसाठी काहीही करू शकतो. तो लेकीसाठी एकाच नात्यात हजारो नाती निभावत असतो. आयुष्यात कितीही मोठ्या संकटांची लाट येऊ देत; बाबा हा किनाऱ्यासारखा भक्कम उभा असतो. यावेळी लेकीचं लग्न म्हणजे वडिलांच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा क्षण असतो. बाप मोठ्या थाटामाटात लेकीचं लग्न लावून देतो मात्र ज्या प्रकारे कुटुंब आपल्या लाडक्या लेकीचं मंगलकार्य समाजासमोर, थाटामाटात करतात, त्याचप्रमाणे तिच्यावर आलेल्या संकटांमध्येही कुटुंबानं तिच्यासोबत समाजासमोरच उभं राहिलं पाहिजे. ज्या प्रकारे तिची पाठवणी करता, त्याच प्रकारे अडचणीतही तिच्यासाठी माहेरच्यांनी परतीची दारं उघडी ठेवायलाच हवीत.
आपण बऱ्याचशा अशा घटना ऐकल्या आहेत; ज्यात मुली सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या करतात. अशातच नुकतंच समोर आलेलं ताजं प्रकरण म्हणजे, वैष्णवी हगवणे. पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येप्रकरणामुळे अवघ्या राज्याचा काळजाचा ठोका चुकला. श्रीमंत, सुशिक्षित घरातील लेकीने हे पाऊल उचलल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. तर दुसरीकडे आजही सुशिक्षित आणि प्रतिष्ठित घरांमध्येही हुंड्यासाठी सुनेचा छळ केला जातो.
“दिल्या घरी सुखी राहा असं आता नाही चालणार…“
दरम्यान तुम्हालाही जर स्वत:च्या लेकीची वैष्णवी हगवणे होऊ नये असं वाटत असेल तर तुम्हीही तुमच्या लेकीला हे नक्की सांगा..सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय, यामधून एक संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये “दिल्या घरी सुखी राहा असं आता नाही चालणार…सुख नसेल तर परत ये..आम्ही तुझी कायम वाट बघतोय.. तुझाच बाबा” असं लिहलं आहे. याचा अर्थ असा की अजिबात अन्याय सहन करु नकोस, जग काय म्हणेल? आमची इभ्रत,आमची प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी काही कामाच्या नाहीत. जर तुमची मुलगीच या जगात नसेल तर त्या समाजाचं आणि त्या इभ्रतीचं काय लोणचं घालणार का तुम्ही? अशा हजारो वैष्णवींना वाचवण्याची एक समाज म्हणून आपलीच जबाबदारी आहे… तो बदल आपण आपल्या घरापासून सुरू करू शकतो…
सासरी जाणाऱ्या मुलीला बापानं “हे” सांगितलंच पाहिजे
विशेष म्हणजे मुलीला होत असलेल्या त्रासाची माहेरच्यांना कल्पनाही नसते आणि मग ती कायमची गेल्यानंतर या गोष्टी समोर येतात. कारण- तिनं कधी तिला होणारा त्रास हा माहेरच्यांना सांगितलेलाच नसतो. अर्थात, त्यामागेही अनेक कारणं असू शकतात; पण माहेरच्यांनीही मुलीला विश्वासात घेऊन तुझ्यासाठी घराचे दरवाजे नेहमी उघडे आहेत, हा आत्मविश्वास द्यायला हवा आणि त्यासाठी संवाद हा खूप महत्त्वाचा आहे.
पाहा व्हिडीओ
आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे महत्त्वाचे
मुली या कोमल हृदयाबरोबरच खंबीर मनाच्या धनीही असतात, तेव्हा त्यांनी आपल्या आयुष्याला दिशा देण्यासाठी जिकिरीने प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी त्यांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचा ठाम निश्चय करावा. सासरच्यांच्या छळापुढे गुढघे न टेकता, धाडसीपणे तोंड देण्यासाठी कायद्याचा आधार घ्यावा. मुलींजवळ स्त्रीधनाच्या स्वरूपात थोडीफार जमापुंजी असते, त्याचा उपयोग करून एखादं प्रशिक्षण घेऊन लवकरात लवकर स्वबळावर उभं राहावं. आणि त्यासाठी माहेरच्यांनी मुलीसाठी परतीची दारं उघडी ठेवायलाच हवीत. कारण- काहीही झालं तरी शेवटी लेक महत्त्वाची आहे.