काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी लग्न करण्याची इच्छा एका महिलेने व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत या महिलेने राहुल गांधी यांच्या सोबत विवाह करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. इतकेच नाही तर आपण २००६ मध्ये राहुल यांच्यासमोर ही इच्छा व्यक्त केली होती असा दावाही तिने केला आहे. या मुलाखतीची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
वाचा : मोदींना नोटाबंदीची किंमत चुकवावी लागेल- राहुल गांधी
उत्तर प्रदेशमधल्या अलाहाबाद येथील काँग्रेस सेवा दलाची ही महिला कार्यकर्ता आहे. तिचे नाव अद्यापही समजू शकले नाही. राहुल गांधी यांच्याशी आपल्याला लग्न करण्याची प्रबळ इच्छा तिने समाज माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे. ‘२००६ मध्ये आपण राहुल गांधींना भेटलो होतो आणि तेव्हा लग्न करण्याची इच्छा मी त्यांना बोलून दाखवली’ असेही तिने सांगितले. आपल्या प्रेमाची खुलेआम कबुली माध्यमांसमोर दिल्याने तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. ‘राहुल गांधी यांनी प्रत्यक्षात मात्र आपल्याला लग्नाचे वचन दिले नसले तरी ते माझ्या स्वप्नात येतात आणि स्वप्नात त्यांनी अनेकदा मला लग्नाचे वचन दिले आहे’ असेही या महिलेने मुलाखतीत सांगितले. राहुल गांधींच्या नेतृत्वगुणांनी मला भुरळ घातली असून मला त्यांच्याशीच लग्न करायचे असेही ती म्हणाली.
आपण अनेकदा कार्यक्रमातून राहुल गांधीना भेटलो आहोत तसेच त्यांच्याशी लग्न करण्याची अनेक कारणेही तिने बोलून दाखवली. ‘राहुल गांधींना देशातील दलितांविषयी आदर आहे. दलितांशी बोलताना, त्यांच्यासोबत जेवताना त्यांना अजिबात कमीपणा वाटत नाही. ते खूपच चांगले आहे’ अशी स्तुतीसुमनेही या महिलेने राहुल गांधींवर उधळली आहेत.राहुल गांधीच्या याच चांगल्या स्वभावावर आणि नेत्तृत्व गुणांवर मी भाळली असून मला लग्न करायचे असल्याचे तिने कबुल केले आहे. आपण ओबीसी समाजाचे असून आपल्याला समाजात वावरताना अनेक अडचणींना समोरे जावे लागते. पण राहुल गांधीशी लग्न झाले तर आपल्या अनेक समस्या दूर होतील अशी आशा या महिलेला आहे. राहुल गांधी हे नेते आहेत त्यांची पत्नी बनली तर आपला त्रास दूर होईल असेही तिने सांगितले आहे. राहुल गांधीना आपण भेटलो असून त्यांनी अनेकदा माझी आपुलकीने चौकशी केली आहे आणि त्यांच्या मनात देखील माझ्याविषयी प्रेम आहे असा दावा या महिलेने केला आहे. राहुल गांधीचे लग्न अद्यापही झाले नाही. त्यामुळे अनेकदा त्यांच्या लग्नाविषयी त्यांना प्रश्न विचारले जात आहेत.