राष्ट्रपतींच्या शपथविधीचा कार्यक्रम आज दिल्लीत मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवन ते संसदेपर्यंतचा प्रवास एका पारंपरिक बग्गीतून केला. या बग्गीला अतिशय वेगळा असा इतिहास असून त्यातून प्रवास करणे अतिशय मानाचे समजले जाते. अनेक वर्षांपासून राष्ट्रपतींच्या शपथविधीसाठी आणि इतर काही महत्त्वपूर्ण कार्यक्रमांदरम्यान या बग्गीचा आवर्जून वापर केला जातो.

जाणून घ्या ‘राष्ट्रपती भवना’बद्दल काही रंजक गोष्टी

ही बग्गी नेमकी आली कुठून?

ही ऐतिहासिक बग्गी गोल्ड प्लेटेड असून ब्रिटीशकालिन भारतीय व्हॉईसरॉय यांची ती आहे. या बग्गीला विशेष घोडे लावण्यात आले आहेत. ब्रिटीश काळानंतरही ही बग्गी इथे कशी काय ही विशेष गोष्ट आहे. भारत पाकिस्तान यांची फाळणी झाल्यानंतर दोन्ही देशांना ही बग्गी हवी होती. मात्र हे भांडण मिटविण्यासाठी कोणी वरिष्ठ नव्हते. त्यावेळी टॉस करुन बग्गी कोणाला मिळणार याचा निर्णय घेण्याचे ठरले आणि अर्थातच यामध्ये भारताचा विजय झाल्याने ही बग्गी भारताकडे आहे.

१९८४ नंतर ही बग्गी वापराविना पडून होती. मात्र २०१४ नंतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुन्हा ही बग्गी वापरण्यास सुरुवात केली. याआधीच्या राष्ट्रपतींकडून ही विशेष बग्गी केवळ महत्त्वाच्या कार्यक्रमांना जाण्यासाठीच नाही तर राष्ट्रपती भवनाच्या ३२० एकर भागात फिरण्यासाठीही या बग्गीचा वापर केला जात होता. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव या बग्गीचा वापर कमी करण्यात आला. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ज्याप्रमाणे ही ऐतिहासिक बग्गी वापरण्यास सुरुवात केली त्याचप्रमाणे नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंदही ही बग्गी वापरतील अशी आशा आहे.