मोबाईल ही चैन नसून आता गरज बनली आहे. मोबाईलच्या आहारी आपण इतके गेले आहोत की काही मिनिटे जरी तो आपल्या नजरेसमोर नसला की जणू अनेकांना अस्वस्थ वाटू लागते. सतत मोबाईलवर गेम खेळणे, मेसेज करणे, सोशल मीडियावर सक्रिय असणे, सेल्फी काढणे, गाणी ऐकणे, सिनेमा पाहणे अशा एक ना दोन अनेक गोष्टी एकाच वेळी आपण मोबाईलवर करत असतो पण या सगळ्या गोष्टी करण्याच्या नादात अनेकदा मोबाईलची बॅटरी अत्यंत जलद गतीने उतरते. चार्जिंग करायलाही वेळ नसतो. पॉवर बँकही सोबत घेऊन कितींदा फिरणार? ती ही कधीतरी चार्ज करावी लागतेच. त्यामुळे  मोबाईलची बॅटरी वाचवायची असेल तर या ट्रिक्स नक्की करुन पाहा ! फोनची बॅटरी नक्की वाचेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– गरज नसल्यास ‘एरोप्लेन मोड’वर मोबाईल ठेवा. ‘एरोप्लेन मोड’वर फोन ठेवल्यानंतर नेटवर्क पूर्णपणे बंद होते म्हणजे तुमच्या फोनवर ना कोणी कॉल करू शकत ना मेसेज. जर तुम्हाला महत्त्वाचे फोन येणार नसतील तेव्हा तुम्ही या मोडचा वापर करून गाणी ऐकू शकता किंवा चित्रपट देखील पाहू शकता.
– अनेकदा मोबाईलमध्ये असे काही अॅप्स असतात ज्यामुळे मोठ्या प्रमाणात बॅटरी खर्चिली जाते. तेव्हा गरज नसल्यास हे अॅप्स बंद करा. असेही अॅप्स आहेत जे बॅटरीचा वापर कमी करण्यास मदत करतात तेव्हा बॅटरी वाचवण्यासाठी या अॅप्सचा वापर तुम्ही करु शकता.
– जास्तीत जास्त लोक हे व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवर सक्रिय असतात. अशा वेळी मेसेज टाईप करताना शक्यतो किपॅडवरचे व्हायब्रेशन काढून टाका. कारण व्हायब्रेशनसाठी अधिक बॅटरी खर्च होते.
– आणखी एक ट्रिक म्हणजे जर तुमच्या मोबाईलला अॅमोलेड डिस्प्ले असेल तर शक्यतो वॉलपेपर ठेवताना काळी किंवा गडद रंगछटा असलेल्या वॉलपेपरचा वापर करा.
– मोबाईलमध्ये जीमेल वापरत असाल तर ‘ऑटो सिंक’ मोड बंद करायला विसरु नका.
– जीपीएसमुळे देखील मोठ्या प्रमाणात बॅटरी खर्च होते, त्यामुळे आवश्यक्यता नसल्यास त्याचाही वापर टाळा.
– गरज नसल्यास मोबाईल डेटा बंद करून ठेवा, बॅटरी वाचवण्याचा हा सगळ्यात उत्तम उपाय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to save mobile battery
First published on: 11-11-2016 at 12:09 IST