IAS Ajitabh Sharma: भारतात लोकप्रतिनिधीनंतर सर्वाधिक सन्मान आणि आदर सनदी अधिकाऱ्यांचा केला जातो. जनहिताचे धोरण राबविणे आणि सरकारी योजनेचा लाभ शेवटच्या इसमापर्यंत पोहोचविण्याचे काम सनदी अधिकारी करत असतात. सरकारने केलेले निर्णय प्रत्यक्षात आणणे आणि भविष्याचा व्याप लक्षात घेऊन धोरणे आखण्याचेही काम सनदी अधिकाऱ्यांचे असते. राजस्थानच्या ऊर्जा विभागाचे विभागाचे प्रधान सचिव अजिताभ शर्मा यांनी नोकरशाहीच्या कार्यसंस्कृतीबाबत लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर केली आहे. प्रशासकीय कामावर प्रकाश टाकणारी ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

९६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी अजिताभ शर्मा यांनी पोस्टमध्ये लिहिले, “आमच्या दैनंदिन आणि रोजच्या नियमित कामांमुळे सनदी अधिकाऱ्याचे दूरगामी परिणाम टाकणारे काम मागे पडत चालले आहे. रोजच्या बैठकांना हजेरी लावणे, पारदर्शकता आणण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणे, विभागाशी संबंधित आलेल्या बातम्यांना उत्तर देणे, पत्रांना उत्तर देणे… अशा पद्धतीच्या बिगर महत्त्वाच्या कामांमध्ये आमचा ८० टक्के वेळ जातो.”

शर्मा पुढे असे म्हणतात की, ही कामे महत्त्वाची आहेतच. पण या कामातच सर्व वेळ निघून जातो. ज्यामुळे आमच्या खऱ्या कामासाठी अधिक वेळ उरत नाही. ऊर्जा, आरोग्य, शेती, नगर विकास अशा विभागांमध्ये एखादी मोहीम राबविल्याप्रमाणे काम करणे आवश्यक आहे.

मुख्य कामापासून इतर कामांमध्ये (Non Core Work) अधिक वेळ गेल्यामुळे एखाद्या अधिकाऱ्यावर तज्ज्ञ प्रशासक असा खोटा शिक्का बसू शकतो, पण यातून त्याच्या विभागाची सेवा सुधारेल, असे होणार नाही, अशी प्रांजळ कबुलीही शर्मा देतात.

राजस्थानच्या ऊर्जा विभागाचा प्रधान सचिव पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर शर्मा यांनी ही परिस्थिती बदलण्याचा मानस व्यक्त केला आहे. माझा ८० टक्के वेळ मुख्य कामांसाठी समर्पित करण्यासाठी प्रयत्न करेन, असे शर्मा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अजिताभ शर्मा यांची पोस्ट सध्या व्हायरल होत असून अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे. या पोस्टमुळे इतर सनदी अधिकारी, धोरणकर्ते आणि सामान्य युजर चांगलेच प्रभावित झाल्याचे दिसते. मुख्य कामांना अधिक वेळ देण्याबद्दल शर्मा यांनी केलेल्या विधानावर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

वाचकांच्या काही प्रतिक्रिया

लिंक्डइनवर शर्मा यांच्या पोस्टला हजारो लाइक्स मिळाल्या असून ५०० हून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने म्हटले की, शर्मा यांच्यासारखे प्रामाणिक व्यक्तिमत्व प्रशासकीय विभागात लाभणे दुर्मिळ होत चालले आहे. सध्या कामाचा आणि जगण्याचा वेग वाढला आहे. अशात शर्मा यांच्यासारखा खोलवर जाऊन दूरगामी विचार करणारा अधिकारी पाहून अभिमान वाटतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्या एका युजरने लिहिले की, तुमच्या विचारांमधील स्पष्टता आणि प्रशासनाच्या वास्तव आव्हानावर तुम्ही मांडलेले विचार खरोखरच उत्तम आहेत. मुख्य कामावर लक्ष केंद्रीत करण्याचा तुमचा संकल्प फरक पडणारा ठरो.