लहानशा सापाला पाहूनच अंगावर काटे येतात. तर मोठ्या सापाला पाहून रायबरेलीच्या लोकांची काय अवस्था झाली असेल, याचा अंदाज तुम्हाला रायबरेलहून आलेला व्हिडिओ पाहून येईल. उत्तर प्रदेशमधील रायबरेली येथे एका शाळेच्या बसच्या इंजिनमध्ये भलामोठा अजगर आढळला आहे. या अजगराला वाचवतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्याला पाहून अनेकांचा थरकाप उडाला.

आयएफएस अधिकारी सुसांता नंदा यांनी या अजगराचा व्हिडिओ शेअर केला आहे. या अजगराचे वजन ८० किलो असून त्याची लांबी ११ फूट आहे. व्हिडिओमध्ये अजगराला इंजिनमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहे. मात्र तो काही बाहेर येण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीये. काठीने या अजगराला ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला काढण्यासाठी भरपूर प्रयत्न होतात. शेवटी अचानक तो बाहेर निघतो.

(लॉटरीसाठी नशीबच नव्हे, बुद्धीचाही लागतो कस; अमेरिकेतील व्यक्तीने ‘असे’ जिंकले ४१ लाख रुपये)

नागरिक बसच्या खिडकीतून या भीमकाय अजगराची झलक पाहताना दिसत आहे. अनेक प्रयत्न करूनही अजगर बाहेर निघत नाही. शेवटी एकादाचा बाहेर निघाला तेव्हा नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. सुसांता यांनी या व्हिडिओला कॅप्शन देखील दिले आहे. त्यांनी या सापाला ‘मोस्ट रिलेक्टंट स्टुडंट’ म्हणजेच, सर्वात अनिच्छुक विद्यार्थी असे संबोधले आहे. अहवालांनुसार, अजगराला इंजिनबाहेर काढण्यासाठी वन विभागाने खूप प्रयत्न केले. तासाभराच्या प्रयत्नांनंतर हे अजगर बाहेर काढण्यात विभागाला यश आले. त्यानंतर अजगराला जंगलात सोडण्यात आले.

दरम्यान व्हिडिओतील विशाल अजगराला पाहून नेटकरीही अवाक झाले आहे. शाळेच्या बसमध्ये ते सापडल्याने हे भयानक असल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. तर काहींनी या अजगराला पाहून गंमत देखील केली आहे. शाळेत मोगली सापडेल या आशेने हा अजगर बसमधून बाहेर पडण्यासाठी तयार नसावे, अशी मजेदार प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. तर, पायथॉन भाषा शिकवण्यासाठी हे अजगर आले असावे, असा अंदाज एकाने व्यक्त केला.