Viral Video : एखादा विशिष्ट कार्यक्रम आणखीन खास करण्यासाठी विविध प्रकारचे खेळ खेळले जातात. लग्न समारंभात, हळदीत, संगीत या कार्यक्रमांना आणखीन खास करायचे असल्यास विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही डान्स बसवले जातात, तर काही अनोखे खेळ खेळण्यात येतात; तर आज सोशल मीडियावर असंच काहीसं पहायला मिळालं आहे. संगीत कार्यक्रमात एक वेगळाच संगीतखुर्चीचा खेळ खेळण्यात आला आहे.

व्हिडीओ एका संगीत कार्यक्रमाचा आहे; ज्यात संगीत खुर्ची हा खेळ सुरू आहे, पण हा संगीतखुर्चीचा खेळ नेहमीसारखा नसून थोडा हटके आहे. तुम्ही व्हिडीओत बघू शकता की, संगीत खुर्चीत भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला वर्तुळाकार खुर्च्या मांडून पाठमोरे बसवले जाते आणि निवेदिका खुर्च्यांवर बसलेल्या स्पर्धकांना, जमलेल्या मंडळींकडून काही गोष्टी घेऊन यायला सांगते. सगळ्यात पहिल्यांदा निवेदिका लहान मुलाचे मोजे आणायला सांगते आणि गाणं वाजायला सुरुवात होते आणि सगळे स्पर्धक धावत मोजे आणायला जातात. तेवढ्यात स्पर्धक ज्या खुर्च्यांवर बसलेले असतात, त्यातली एक खुर्ची काढून टाकण्यात येते आणि जो सगळ्यात शेवटी लहान मुलाचे मोजे घेऊन येईल तो पहिल्या फेरीतून बाद होतो. दुसऱ्या फेरीत निवेदिका चष्मा घेऊन यायला सांगते. पुन्हा सगळे स्पर्धक चष्मा शोधण्यासाठी जागेवरून उठतात आणि पुन्हा एक खुर्ची कमी करण्यात येते आणि आणखीन एक जण या फेरीतून बाद होतो.

त्यानंतर तिसऱ्या फेरीत स्पर्धकांना त्यांच्या लहान मुलांना घेऊन येऊन खुर्चीवर बसण्यास सांगते. सगळे स्पर्धक पुन्हा जागेवरून उठतात आणि एक खुर्ची कमी करण्यात येते आणि सगळ्यात शेवटी जो आपल्या मुलाला खुर्चीवर बसण्यासाठी घेऊन येईल, तो तिसऱ्या फेरीतून बाद होतो. त्यानंतर चौथ्या फेरीत २० रुपयांची नोट निवेदिका स्पर्धकांना घेऊन येण्यास सांगते, तेव्हा आणखीन एक खुर्ची कमी करण्यात येते आणि जो शेवटी येईल तो या फेरीतून बाद होतो. असे करता करता शेवटच्या फेरीत दोन स्पर्धक उरतात आणि अटीतटीचा सामना रंगला जातो व निवेदिका शेवटच्या फेरीसाठी अनोखा टास्क देते. काही तरी गोड घेऊन येऊन ज्यांचं संगीत असते त्या जोडप्याला भरवायला सांगते आणि दोन्ही स्पर्धक गोड पदार्थ घेऊन येण्यासाठी धाव घेतात. तसेच दोन्ही खुर्च्या काढून बाजूला ठेवल्या जातात आणि जो सगळ्यात पहिला जोडप्याला गोड पदार्थ भरवतो तो या खेळाचा विजेता होतो.

हेही वाचा… ‘बाईपण भारी देवा’ची हवा कायम! काळाचौकीच्या महागणपतीच्या आगमनाला रंगला मंगळागौरीचा खेळ, Video पाहा

व्हिडीओ नक्की बघा :

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ (@nas.rin) या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ही युजर या व्हिडीओत निवेदन करत होती. व्हिडीओ पाहणाऱ्या अनेकांना संगीत खुर्चीचा हा हटके खेळ खूप जास्त आवडला आहे; तर काही जण निवेदिकेच्या निवेदनाचं कौतुक करताना दिसत आहेत. काही जण व्हिडीओतील खेळादरम्यानचे अनेक मजेशीर क्षण कमेंटमध्ये सांगताना दिसत आहेत. संगीत खुर्चीचा खेळ तुम्ही आतापर्यंत अनेकदा खेळला असाल, पण या व्हिडीओतील संगीत खुर्चीचा हा खेळ खूपच अनोखा आहे, जो तुमचा बघण्याचा उत्साह नक्कीच वाढवेल