India Won Asia Cup 2025 Final against Pakistan: आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पराभव केला आणि भारतात दिवाळीच्या एक महिना आधीच दिवाळी साजरी झाली. आख्ख्या स्पर्धेत न खेळलेल्या रिंकू सिंहनं विजयी फटका मारला आणि भारतीय संघानं एकच जल्लोष केला. भारताच्या या विजयानंतर पाकिस्तानचा संघ व संघातील खेळाडूंना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान संघाच्या चाहत्यांकडूनच आपल्या संघाच्या कामगिरीवर तोंडसुख घेतलं जात आहे. पाकिस्तानच्या अशाच एका चाहत्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
नाणेफेक जिंकून सूर्यकुमार यादवनं गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानची सुरुवात दमदार झाली. दोन्ही सलामीवीरांनी पाकिस्तानला ८४ धावांची सलामी दिली. पण त्यानंतरच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आलं. भारतीय गोलंदाजांच्या तिखट माऱ्यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांगी टाकली आणि २० षटकांमध्ये पाकिस्तानला फक्त १४६ धावा करता आल्या. विजयासाठी १४७ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियानं ५ गडी राखून पाकिस्तानला नमवलं आणि आशिया चषक आपल्या नावावर केला.
पाकिस्तानच्या चाहत्याची आगपाखड
दरम्यान, पाकिस्तानच्या पराभवावर त्यांचे चाहते प्रचंड नाराज झाल्याचं दिसत आहे. एका चाहत्यानं एका व्हिडीओमध्ये दिलेल्या प्रतिक्रियेत पाकिस्तान संघाला अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली. “बाबर आझम सोडा, आख्खा पाकिस्तान भारताशी खेळला तरी आपण भारताला हरवू शकत नाही. आपली लायकीच नाहीये त्यांच्याविरुद्ध जिंकायची. आपल्याला त्यांनी असा काही धडा शिकवलाय की आपल्या कितीही पिढ्या जन्माला आल्या, तरी आपण भारताला पराभूत करू शकत नाही. भारत आपला बाप होता आणि बाप राहणार”, अशा शब्दांत या चाहत्यानं आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
भारताविरुद्ध पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी चाहत्याची आपल्याच संघावर आगपाखड #INDvsPAK #AsiaCup2025 #indvspak2025 #PAKvsIND #AsiaCup2025 #india pic.twitter.com/4h1cPBJYkK
— prathamesh waidande (@PrathamWaidande) September 29, 2025
पराभवासाठी थेट सरकारलाच लक्ष्य केलं!
“आम्ही कधीपर्यंत रडायचं. आमच्या पाकिस्तानमध्ये दुसरा कुठलाच आनंद नाही. एक क्रिकेट आहे, पण त्याचीही या लोकांनी पार वाट लावून टाकली आहे. मूर्खांना टीममध्ये घेऊन फिरतोय आपण. हुसैन तलत कॅच सोडतोय, त्याला संघात घेऊन फिरतोय आपण. आम्ही काय करायचं? कुठे जायचं? मला पाकिस्तान सरकारकडून उत्तर हवंय”, असं म्हणत या चाहत्यानं आशिया चषकातील पराभवासाठी थेट पाकिस्तान सरकारलाच लक्ष्य केलं!
“आपण त्यांच्या पायातल्या चपलेच्याही बरोबरीचे नाहीत”
दरम्यान, हा पाकिस्तानी चाहता इतका संतापला होता की त्यानं चक्क पाकिस्तानच्या संघाची तुलना भारताच्या पायातल्या चपलेशी केली! “ही काय टीम आहे का? आपण काय भारताच्या बरोबरीचे आहोत का? आपण त्यांच्या पायातल्या चपलेच्याही बरोबरीचे नाहीत. मी आज सगळ्यांसमोर हे बोलतोय. इंडिया, आय लव्ह यू. आमच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न करून तुम्ही बरोबरच केलं. तुम्ही जर त्यांच्याशी हस्तांदोलन केलं असतं, तर तुम्हालाही अपशकुन झाला असता. बस, आणखी किती शिव्या देऊ मी यांना?” असा उद्विग्न सवालही या चाहत्यानं शेवटी केला.