Independence Day 2025: या वर्षी १५ ऑगस्ट २०२५ रोजी देश ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.भारताला अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळालेले आहे. अगणित लाखो स्वातंत्र्यवीरांनी भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त केले होते. आज या घटनेला ७८ वर्षे होत आहेत. भारतीय लोक हा दिवस उत्साहात साजरा करतात, शैक्षणिक संस्था, कार्यालये आणि सरकारी आस्थापनांमध्ये ध्वजारोहण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का इंग्रजांपासून स्वतंत्र झाल्यानंतरचा पहिला स्वातंत्र्यदिन कसा झाला असेल. ज्या दिवशी ब्रिटीशांनी आपल्याला गुलामीतून मुक्त केलं, तो क्षण किती थरारक आणि ऐतिहासिक असेल? याच क्षणाचा, आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या स्वातंत्र्य दिनाचा पहिला एक दुर्मीळ व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

त्या क्षणाची झलक पाहण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा, मुंबईत साजरा झालेला पहिला स्वातंत्र्यदिन आणि इतिहासाचं हे जिवंत चित्रण पाहून तुम्ही देखील भावुक व्हाल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही मुंबईतील काही भावूक करणारी दृश्य पाहू शकता.स्वातंत्र्याच्या पहिल्या रात्री, मुंबई विद्यापीठाचा टॉवर, बॉम्बे सचिवालय आणि कौन्सिल हॉल या ठिकाणी रोषणाई करण्यात आली होती. लोक रस्त्यावर “भारत माता की जय” अशा घोषणाबाजी करत होते. त्यांच्या हातात बॅनर्स होते, मिरवणुका निघाल्या होत्या. इतक्या वर्षांचं स्वप्न, अगणित बलिदान या सगळ्यानंतर अखेर तो दिवस आला आणि त्यानंतरचा हा आनंद लोकांच्या चेहऱ्यावर झळकत होता. आणि हे सर्व क्षण तुम्ही या व्हिडीओमध्ये अनुभवू शकता.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @mumbaiheritage या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओचं चित्रण British Pathé या डॉक्युमेंट्री तयार करणाऱ्या संस्थेनं केलं आहे.

स्वातंत्र्यदिन २०२५ ची थीम काय आहे? (Independence Day Theme)

भारत सरकारने यावर्षीच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची अधिकृत थीम अजून जाहीर केलेली नाही. दरवर्षी सरकार स्वातंत्र्यदिनाची थीम एकता, देशप्रेम, सामाजिक प्रगती आणि भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदान यांसारख्या मूल्यांवर ठेवते. यावर्षीची थीमही याच मूल्यांवर आधारित असेल आणि त्यात राष्ट्रीय विकासावर भर असेल, अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनाची थीम “विकसित भारत २०४७” होती. या उपक्रमाचा उद्देश २०४७ मध्ये स्वातंत्र्याच्या शताब्दीत भारताला विकसित राष्ट्र बनवणे हा आहे.