Edelweiss CEO Radhika Gupta Defines Meaning Of Middle Class In India: काही काळापूर्वी, वर्षाला ७० लाख रुपये इतका पगार एखाद्या स्वप्नांसारखा होता. आज, या आकाराचे उत्पन्न कमावणाऱ्यांना भारतात “मध्यमवर्गीय” म्हणायचे की नाही यावर मतभेद आहेत. राहुल जैन यांच्या अलिकडेच्या एका पॉडकास्टमध्ये हा प्रश्न चर्चेत आला आणि एडलवाईस म्युच्युअल फंडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राधिका गुप्ता यांनी यावर स्पष्ट उत्तर देत म्हटले आहे की, ७० लाखांचे उत्पन्न कमावणारे मध्यमवर्गात येत नाहीत.
“आता आपण ज्याला मध्यमवर्गीय म्हणू इच्छितो ते म्हणायला ‘कूल’ वाटते. पण, वास्तव असे आहे की, आपल्यापैकी कोणीही मध्यमवर्गीय नाही. मध्यमवर्गाची तांत्रिक व्याख्या ७० लाख रुपये उत्पन्न असू शकत नाही. ७० लाख रुपये उत्पन्न उच्च वर्गात मोडते.”
तरीही भारतातील मोठ्या शहरांमध्ये, उच्च पगार असलेल्या अनेक नोकरदारांना असे वाटते की ते केवळ तग धरून आहेत. वाढते भाडे, जीवनशैलीतील वाढलेली महागाई आणि “लोक काय म्हणतील” या सततच्या दबावामुळे सात आकडी पगार देखील अपुरा वाटू लागला आहे.
आयडेंटीटी हँगओव्हर
एडलवाईसच्या राधिका गुप्ता याकडे ‘आयडेंटीटी हँगओव्हर’ म्हणून पाहतात. त्या म्हणाल्या की, “उच्च कमाई करणारे अनेकजण मध्यमवर्गात लहानाचे मोठे झाल्याने, ते अजूनही स्वतःला “मध्यमवर्गीय” म्हणतात.
“आपल्या सर्वांचे मूळ मध्यमवर्गीय आहे. आपल्याकडे मध्यमवर्गीय मानसिकता आहे, मध्यमवर्गीय विचारसरणी आहे, आजी-आजोबा मध्यम किंवा निम्न मध्यमवर्गीय होते. आपल्याला तो शब्द खूप प्रिय आहे. पण खरे सांगू, आपल्यापैकी बहुतेक जण आता मध्यमवर्गीय नाहीत”, असे राधिका गुप्ता यांनी स्पष्ट केले.
तेच खरे मध्यमवर्गीय
राधिका गुप्ता यांनी या पॉडकास्टमध्ये म्हटले की, “वर्षाला ५ ते ८ लाख रुपये उत्पन्न असणारेच खरे मध्यमवर्गीय आहेत, ७० लाख रुपये कमावणारे नव्हे. देशाची लोकसंख्या १४० कोटी आहे, सर्वांना एकच लेबल लावणे अर्थहीन आहे. साधारणपणे १० कोटी लोक दरवर्षी १० ते १२ लाख रुपये कमवतात, तर १०० कोटींहून अधिक लोक १.७ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न मिळवतात.”
सोशल मीडियामुळे परिस्थिती बिकट
सोशल मीडियामुळे परिस्थिती आणखी बिकट झाल्याचे सांगत राधिका गुप्ता म्हणाल्या, “मी एका जेन झेड मुलाशी बोलले. मी विचारले की, तुम्ही ६०-७० तासांच्या कामाच्या आठवड्याला का विरोध करता. यावर तो म्हणाला, ‘आम्हाला जिममध्ये जावे लागते, फिटनेस राखावा लागतो, सुट्ट्या घ्याव्या लागतात कारण आम्ही सोशल मीडियावर स्पर्धा करत असतो.'”
चिंता वाढवणारी तुलना
यावेळी राधिका गुप्ता यांनी इशारा दिला की, पैशाची ही सार्वजनिक तुलना चिंता वाढवणारी आहे. “बचत आणि खर्च यांच्यात नेहमीच संघर्ष होता. पण आज तो अतिशयोक्तीपूर्ण आहे. कागदावर, ७० लाख रुपये हे उच्च उत्पन्न आहे. पण, सामूहिक मानसिकतेत, ते कधीच पुरेसे वाटत नाही”, असे त्यांनी म्हटले.