Trump Tariff on India : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेले ५० टक्के टॅरिफ लागू झाल्यानंतर भारतातील रेडिमेड कपड्यांच्या उद्योगांना मोठा फटका बसला आहे. भारतात सणासुदीचे दिवस सुरू होत असणाताच हे हे टॅरिफ लागू झाले आहेत. याचा त्रिरुपूर, नोएडा, लुधियाना आणि इतर ठिकाणच्या टेक्सटाइल क्लस्टर्सना धक्का बसला आहे, कारण येथूनच अमेरिकेतील जागतिक ब्रँड्सना निर्यातदार sequined टॉप्सपासून पोलो शर्ट्स, रिसॉर्ट वेअर आणि कफ्तानपर्यंत सर्व काही पुरवतात.

ट्रम्प यांच्या टॅरिफचे परिणाम भारतीय कापड उद्योगांवर स्पष्टपणे दिसून येत आहेत. अनेक खरेदीदारांनी त्यांच्या नव्या ऑर्डर थांबवल्या आहेत. तर काही खरेदीदारांचे म्हणणे आहे की वाढलेल्या शुल्काचा काहीसा भार हा निर्यातदारांनी उचलावा. मात्र उत्पादन खर्च वाढल्याने नफा आधीच कमी झाला आहे, यामुळे अनेक लहान आणि मध्यम आकाराचे उद्योग हे अडचणीत सापडले आहेत.

बाजारात गोंधळाची स्थिती असूनदेखील एक निर्यातदार मात्र यापासून वेगळी स्थिती सांगताना दिसत आहेत. टीस्ट्रा (Teestra) लाइफस्टाइलचे संस्थापक आणि सीईओ वसंत मारीमुथु यांचा अमेरिकेतील व्यवसाय कोणत्याही अडचणीशिवाय सुरू आहे. कस्टम टी-शर्ट्स आणि लहान बॅचमध्ये कपडे बनवणाऱ्या त्यांच्या या कंपनीला टॅरिफच्या वाढीचा काहीही फरक पडला नसल्याचे पाहायला मिळत आहे.

मारिमुथु यांनी सोशल मीडियावर थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना उद्देशून पोस्ट केली आहे. यामध्ये ते म्हणाले की, “हॅलो मिस्टर ट्रम्प – आम्ही अमेरिकेसाठीच्या पुढील सॅम्पल शिपमेंटसाठी तयार आहोत.अमेरिकेतील आमचे ग्राहक अतिरिक्त शुल्कासाठी तयार आहेत. आमच्या मालामध्ये अशा प्रकारचं मुल्य आम्ही घेऊन येतो. आपण या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल आभार.”

अब्जावधींच्या निर्यातीवर संकट

भारत हा जागतीक स्तरावर सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा कापड निर्यातदार देश आहे. ज्यामध्ये आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ३४.४ अब्ज डॉलर्स किमतीचा माल निर्यात करण्यात आला आहे. यापैकी जवळपास अर्धी निर्यात ही अमेरिका आणि युरोपच्या बाजारात करण्यात आली आहे. यामुळे ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफचा यावर परिणाम होणार आहे. भारतात वर्षात जवळपास २२,००० दशलक्ष कपड्यांचे उत्पादन होते, ज्यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळतो.

ट्रम्प यांची आयातशुल्कवाढ बेकायदा- न्यायालय

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या ‘आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायद्या’अंतर्गत (आयईईपीए) भारतासह अन्य देशांवर आयातशुल्क लागू केले आहे, त्यापैकी बव्हंशी अधिकार बेकायदा असल्याचा निकाल अमेरिकेच्या ‘फेडरल अपील्स’ न्यायालयाने शुक्रवारी दिला. मात्र, सध्या हे वाढीव आयातशुल्क लागू राहतील असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

अमेरिकेच्या ‘कोर्ट ऑफ अपील्स फॉर द फेडरल सर्किट’च्या च्या न्यायाधीशांनी ७ विरुद्ध ४ अशा बहुमताने दिलेल्या निकालात असे नमूद करण्यात आले आहे की, ट्रम्प यांना राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्याचा आणि जगातील जवळपास प्रत्येक देशावर आयातशुल्क लादण्याचा अधिकार नाही. यापूर्वी मे महिन्यात न्यूयॉर्कमधील विशेष फेडरल ट्रेड न्यायालयाने अशाच स्वरूपाचा निकाल दिला होता. “ट्रम्प यांना आयातशुल्क लादण्याचे अमर्यादित अधिकार देण्याची काँग्रेसची इच्छा आहे असे दिसत नाही,” असे मत न्यायालयाने व्यक्त केले. मात्र, न्यायालयाने आयातशुल्क तातडीने रद्द करण्याचे निर्देश दिले नाहीत. फेडरल न्यायालयाने या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाला वेळ दिला आहे.