Indian Delivery Worker in US Viral Video: अमेरिकेच्या टेक्सासमध्ये नुकतीच एका भारतीय कर्मचाऱ्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. विदेशात जाऊन काम करणाऱ्या भारतीयांना सातत्याने स्थानिक लोकांच्या छळाला बळी पडावे लागत आहे. अशातच आता अमेरिकेत डिलिव्हरीचे काम करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अमेरिकन ड्रीम पूर्ण करण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करून तिथे गेल्यावरही संघर्ष थांबत नाही. एकाकीपणा, अवमान सहन करत काम करावे लागत असल्याचे या डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगितले. एका अमेरिकन ग्राहकाने लपून काढलेल्या या व्हिडीओमध्ये सदर भारतीय कर्मचारी मायदेशी परतायचे असल्याचे सांगतो.

व्हिडीओमध्ये भारतीय नागरिक काय म्हणाला?

डिलिव्हरी दिल्यानंतर सदर ग्राहक तू स्पॅनिश आहेस की चिनी? असा प्रश्न विचारतो. यावर मी भारतीय असल्याचे उत्तर डिलिव्हरी कर्मचारी देतो. तुला अमेरिकेत राहायला आवडते का? असा प्रश्न ग्राहकाने विचारल्यानंतर मात्र डिलिव्हरीचे काम करणारा व्यक्ती भावनिक होतो. तो म्हणतो की, मला परत भारतात जायचे आहे. मला इथे कुणीही स्वीकारत नाही. तू चांगला आहेस म्हणून माझ्याशी बोलत आहेस. पण इथे स्थलांतरितांशी कुणीही बोलत नाही. मी पूर्वी स्थलांतरित होतो, पण आता नागरिक होणार आहे. तरीही मी दुःखी आहे.

सदर ग्राहक पुन्हा विचारतो की, राष्ट्राध्यक्ष की इथले लोक, यांच्यापैकी कुणाचा अधिक त्रास होतो. यावर डिलिव्हरी कर्मचाऱ्याने सांगितले की, काम करत असताना रोज कुणाशी ना कुणाशी बाचाबाची होते. माझ्या दोन मुली आहेत. त्यांना आता भारतात परतायचे नाही. त्यामुळे मी इथेच अडकलो आहे. मला अमेरिका कायमची सोडायची आहे, कारण जर इथले लोकच स्वीकारणार नसतील तर राहून काय उपयोग? पण दुर्दैवाने माझ्या मुली आणि पत्नीला अमेरिका सोडायची नाही.

सदर व्हिडीओ सर्व सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या डिलिव्हरी कर्मचाऱ्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. तसेच अमेरिकेतील भारतीय समुदायाला भेडसावणाऱ्या समस्यांची आणि आव्हानांची पुन्हा चर्चा होत आहे. विशेषतः पालकांनी त्यांच्या मुलांना चांगले भविष्य देण्यासाठी केलेल्या त्यागाबद्दल लोक चर्चा करत आहेत.

एका युजरने लिहिले की, सदर कर्मचाऱ्याचा अनुभव ऐकून वाईट वाटले. अनेकांना हे दुःख सहन करावे लागत आहे. पण काही लोक द्वेष करत राहतात. त्यामुळे भारतीय नागरिकांनी कणखर राहण्याची आवश्यकता आहे. त्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. वेळेबरोबर सर्व काही ठीक होईल. पण इथले लोक तुम्हाला स्वीकारतील, याची अपेक्षा ठेवू नका.

एका अमेरिकन युजरने म्हटले की, या माणसाची माहिती काढून मला द्या. मी नक्कीच याला मदत करेन. इथले काही निवडक लोक अशी वागणूक देतात, त्याबद्दल आम्हाला दुःख वाटते. सर्वच लोक वाईट नाहीत. मी प्रत्येकाला स्वीकारतो आणि त्यांचा आदर करतो. या व्यक्तीसाठी मला वाईट वाटते. मेहनत करणाऱ्यांचा सन्मान केला पाहिजे.

दुसऱ्या एका युजरने लिहिले की, सदर डिलिव्हरी कर्मचारी वयस्क वाटतो. कुटुंबासाठी तो मेहनत करतोय, पण त्याची पत्नी आणि मुली त्यांचे दुःख समजू शकणार नाहीत. खूप दुःखद आहे हे.