Indian Woman Post : ३१ वर्षांच्या एका महिलेने लग्नाबाबत केलेली रेडइट पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. या महिलेला लग्नानंतर काही महिन्यांतच आपण चूक केली आहे असं वाटू लागलं आहे. त्यामुळे असा नवरा नकोच असं म्हणत या महिलेने पोस्ट लिहिली आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. नेटकरी या महिलेला विविध सल्लेही देत आहेत.
काय आहे महिलेची Reddit Post?
या महिलेच्या लग्नाला काही महिनेच झाले आहेत. तिने रेडइटवर लिहिलेल्या पोस्टनुसार तिचा नवरा कामाच्या निमित्ताने टूरवर गेला आहे. ती त्याच्याशी फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न करते. पण कधी त्याचं काम संपलेलं नसतं तर कधी तो झोपलेला असतो. त्यामुळे त्या दोघांचं फार बोलणं होत नाही. ती आपली सगळी गाऱ्हाणी त्याच्यापाशी मांडते. मात्र तो तिला म्हणावा तितका वेळ देऊ शकत नाही. मी अशा माणसाशी खरोखर लग्न करुन पस्तावले आहे. लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून माझा नवरा त्याची उरलेली कामं करतो आहे. लग्नाच्या दिवशीही तो काही कामं पूर्ण करत होता. मला बरं वाटत नाही असं एक दिवस त्याला सांगितलं तरीही काही उपयोग झाला नाही. त्याला त्याचं ऑफिस आणि ऑफिसचं कामच महत्त्वाचं आहे.
मला तेव्हा वाटलं की मी चूक केली..
ही महिला पुढे म्हणते, मी आजारी होते म्हणून त्याला फोन केला तर त्याने मला सांगितलं तू आराम कर. मी त्याला मेसेज केले पण त्याने ते बघितलेही नाहीत. नंतरही मी त्याला मेसेज केले. पण त्याने ते पाहिले नाहीत. उलट काही तासांनी मित्रांसह बिअर पित असतानाचे फोटो मला पाठवले. मी आजारी होते, मला त्याच्याकडून मानसिक आधाराची गरज होती. पण तो त्याच्याच धुंदीत होता. मित्रांसह बिअर पितानाचा त्याचा तो फोटो पाहून तर मला खूप वाईट वाटलं. त्याने मला किमान एक मेसेज किंवा कॉल करावा इतकी माझी माफक अपेक्षा होती. यात माझं काय चुकलं? त्यामुळेच मला वाटतंय की मी लग्न करुन पस्तावले आहे. असा नवरा नको गं बाई असंच मला वाटतं आहे. मलाच काय कुणालाही असा जोडीदार मिळू नये या माझ्या भावना आहेत. त्यानंतरही दोन दिवस मला बरं नव्हतं पण तो फक्त शॉर्ट मेसेज करत राहिला आणि त्याची बिझनेस टूर एँजॉय करत राहिला. मला त्याचं हे वागणं मुळीच आवडलं नाही असं ही महिला सांगते.
भावनाशून्य माणसाशील लग्न केल्याचा मला पश्चात्ताप
त्यानंतर या महिलेने म्हटलं आहे आमच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला तेव्हाही त्याने माझ्यासाठी गिफ्ट वगैरे काहीही आणलं नाही. मी जेव्हा लग्न केलं तेव्हा मी खूप उत्साहात होते. लग्नाची तारीख ठरल्यानंतर वर्ष होईपर्यंत प्रत्येक महिन्याला लग्नाच्या तारखेला काय भेट मिळेल किंवा आपण नवऱ्याला काय भेट द्यायची? याचा विचार करुन आनंदले होते. एखादी छोटीशी नोट, एखादं गुलाबाचं फूल हेदेखील त्याने दिलं असतं तर मी खुश झाले असते पण त्याने तेवढंही केलं नाही. त्यामुळेच मी कशाला लग्न केलं? ते पण अशा माणसाशी? असाच प्रश्न मला पडला आहे असं ही महिला या पोस्टमध्ये म्हटली आहे. यानंतर नेटकरी तिला विविध सल्ले देत आहेत.
महिलेची पोस्ट व्हायरल, नेटकरी काय म्हणत आहेत?
महिलेने केलेली ही पोस्ट व्हायरल झाली असून त्यावर नेटकरी या महिलेच्या पोस्टवर व्यक्त होत आहेत. तू लग्नाच्या आधी त्या माणसाला डेट केलं होतंस का? किती काळ डेट केलं होतं? त्यावेळी तुला अंदाज आला नाही का तो कसा आहे? असे प्रश्न विचारत आहेत. काही नेटकरी सांगत आहेत तुझं बरोबर आहे काहींना फक्त आपलं लग्न झालंय इतका एक शिक्का हवा असतो. तू त्याला आरसा दाखवला पाहिजेस, तू स्वतःला कशाला दोष देतेस असं एका महिलेने म्हटलं आहे. माझा एक्स बॉयफ्रेंडही असाच भावनाशून्य माणूस होता असंही एका महिलेने म्हटलं आहे.