International Literacy Day: ८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. लोकांमध्ये शिक्षणाबद्दल जागरूकता वाढावी हा या दिवसाचा उद्देश आहे. कुठल्याही देशाचा विकास व्हावा यासाठी साक्षरता अत्यंत महत्त्वाची असते. जेवढी जास्त लोकसंख्या सुशिक्षित असेल तेवढी जास्त कुठल्याही देशाची प्रगती होते. कुठल्याही देशाची, राज्याची किंवा जिल्ह्याची प्रगती तेव्हाच शक्य होते, जेव्हा तिथले साक्षरतेचे प्रमाण वाढते. मात्र साक्षरता दिवस साजरा करण्याची सुरूवात कधी झाली, त्याचे महत्त्व काय आणि २०२५ची थीम काय आहे हे जाणून घेऊ…

७ नोव्हेंबर १९६५ रोजी युनेस्कोने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. १९६५ मध्ये तेहरानमध्ये झालेल्या निरक्षरता निर्मूलनावरील शिक्षण मंत्र्‍यांच्या ऐतिहासिक जागतिक परिषदेनंतर ऑक्टोबर १९६६ मध्ये झालेल्या १४व्या सर्वसाधारण परिषदेत युनेस्कोने या दिवसाची घोषणा केली.

८ सप्टेंबर १९६७ रोजी झालेल्या उद्घाटन समारंभाने जागतिक स्तरावर हा दिवस साजरा केला गेला. जगातील जवळपास प्रत्येक देशाने याला मान्यता दिलेली आहे. उच्च साक्षरता दर असलेल्या विकसित देशांपासून ते निरक्षरता असलेल्या प्रदेशांपर्यंत सर्व ठिकाणी हा दिवस जागरूकतेसाठी साजरा केला जातो.

८ सप्टेंबरच का?

८ सप्टेंबर रोजी साक्षरता दिन साजरा करण्याचा निर्णय यूएनओ (युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन) आणि युनेस्कोच्या (युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन) शिक्षणासंदर्भातील परिषदांमधून घेतला गेला. १९६५च्या तेहरान परिषदेत निरक्षरता निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर एकत्रित प्रयत्न करण्यात आले. हा जागतिक शैक्षणिक धोरणातील एक महत्त्वाचा क्षण आहे.

या वर्षीची थीम आणि महत्त्व काय?

२०२५साठी युनेस्कोने डिजिटल युगात साक्षरतेला प्रोत्साहन देणे (Promoting Multilingual Education: Literacy for Mutual Understanding and Peace) अशी थीम जाहीर केली आहे. ही थीम डिजिटल परिवर्तनामुळे निर्माण होणाऱ्या आव्हान आणि संधी तसंच पारंपरिक साक्षरतेसह डिजिटल कौशल्यांचे एकत्रीकरण करण्याचे महत्त्व अधोरेखित करते.
बहुभाषिक शिक्षणावर भर दिल्याने समावेश, सक्षमीकरण आणि शांतता निर्माण करण्यात विविध भाषांच्या भूमिकेकडे लक्ष वेधले जाते. बहुभाषिक दृष्टिकोन संज्ञानात्मक विकास आणि सामाजिक एकतेसाठी फायदेशीर समजला जातो.