iPhone 17 launch sparks row with memes: टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅपलने ९ सप्टेंबर रोजी Awe Dropping 2025 कार्यक्रमात आयफोन १७ सीरिज लाँच केली. या सिरीजअंतर्गत आयफोन १७सह आयफोन १७ प्रो, आयफोन १७ प्रो मॅक्स आणि आयफोन एअरदेखील लाँच केला आहे. या कार्यक्रमात कंपनीने सर्व मॉडेल फिचर्स, किंमत आणि कोणत्या रंगांसह उपलब्ध असतील याची माहिती दिली. अॅपलची ही नवीन उत्पादनं १९ सप्टेंबरपासून अमेरिका, भारत, यूके, जपान, युरोपियन देश आणि यूएईसह ५० हून अधिक देशांमध्ये उपलब्ध असणार आहेत.
प्रत्येक आयफोन लाँचनंतर सोशल मीडियावर त्याबाबतच्या प्रतिक्रिया आणि मीम्स व्हायरल होऊ लागतात. अशाचप्रकारे पुन्हा एकदा नेटिझन्सनी आयफोन १७ प्रो च्या लाँचनंतर संमिश्र अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये नेहमीचाच आयफोनसाठी किडनी विकणे आहे हा विनोद सुद्धा आहेच. यावर ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “नवीन आयफोन खूप छान दिसत आहे. खूप दिवसांपासून मलाही असेच बदल अपेक्षित होते”, असे ऑल्टमन यांनी म्हटले आहे.
नेटिझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया
आयफोन सिरीजच्या लाँचनंतर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. काही सोशल मीडिया युजर्सनी विनोदाचे मीम्स पोस्ट केले आहेत, तर काहींनी आयफोन १७च्या डिझाइनची तुलना उंदराच्या डोळ्याशी केली आहे. तसंच काहींनी टॉम हे कार्टून पात्र या नवीन डिव्हाइसला फोडताना दाखवल्याचे मीम्स पोस्ट केले आहेत.
कौतुक करताना एका युजरने म्हटले आहे की, मला असे लोक पाहून खूप आनंद होतो, जे एक चांगला अँड्रॉइड फोन खरेदी करू शकत नाहीत आणि तरीही नवीन आयफोन डिझाइनसाठी अॅपलला ट्रोल करतात. एका एक्स युजरने निराशा व्यक्त करत म्हटले आहे की, नवीन आयफोन प्रो मॅक्स अतिशय कुरूप दिसत आहे असं मला एकट्यालाच वाटत आहे का? त्यांनी डिझाइन खरंच खूप खराब केलं आहे.
आणखी एका युजरने या आयफोनचे वर्णन आतापर्यंतचा सर्वात कुरूप आयफोन असे केले आहे. तसंच त्याने म्हटले की, स्टीव्ह जॉब्सने त्याच्या काळात सर्वांना कामावरून काढून टाकले असते.
आयफोनच्या किमती हादेखील नेटिझन्ससाठी चर्चेचा विषय ठरला. एका एक्स युजरने असे म्हटले की, आयफोन १७चे अनावरण पाहत आहे आणि मला माहीत आहे की ते फक्त २०३२मध्येच परवडेल.
अॅपलने लाँच केलेल्या आयफोन १७ सिरीजमध्ये प्रो, प्रो मॅक्स, एअर आणि स्टँडर्ड मॉडेलचा समावेश आहे. याचे गेल्या काही वर्षांमध्ये अॅपलच्या सर्वात मोठ्या अपग्रेडपैकी एक म्हणून वर्णन केले जात आहे. यामध्ये, डिझाइन, हार्डवेअर आणि विविध प्रकारच्या सुधारणांचा समावेश आहे. याचबरोबर एआय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांनी या सिरीजचे कौतुक केले आहे.