प्रसिद्ध केशरचनाकार जावेद हबीब यांना महिलेच्या केसात थुंकणे महागात पडले आहे. मुझफ्फरनगरमध्ये केशरचनाकार जावेद हबीब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका सेमिनारमध्ये जावेद हबीब यांनी एका महिलेच्या केसात थुंकले होते. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. महिलेच्या तक्रारीवरून मन्सूरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साथीच्या कायद्याशी संबंधित कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये जावेद हबीब महिलेला केस कोरडे असल्याचे सांगत आहेत. यानंतर महिलेच्या केसांना फणी फिरवताना केसांसाठी पाण्याची कमतरता असेल तर हबीब महिलेच्या केसांवर थुंकतात आणि थुंकीत जीव असल्याचे सांगत आहे. हा व्हिडिओ मुजफ्फरनगरमधील एका कार्यक्रमाचा आहे. ३ जानेवारीला एका शोमध्ये हबीब यांनी केसांची देखभाल आणि शॅम्पूचे महत्त्व सांगून पूजा गुप्ताच्या केसात थुंकले होते. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
बरौत येथे राहणाऱ्या पूजा गुप्ता यांनी नंतर विरोध केला. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रारही केली होती. पूजा ब्युटी पार्लर चालवतात. किंग व्हिला हॉटेलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्या आपल्या पतीसोबत गेल्या होत्या. इथेच जावेद हबीब यांनी त्यांच्या केसात थुंकले. पार्लरमध्ये पाणी नसेल तर थुंकून काम करता येईल, असेही सांगण्यात आले.
हबीबने मागितली माफी
हे प्रकरण वाढत असताना जावेद हबीब यांनी गुरुवारी रात्री उशिरा इंस्टाग्रामवर माफी मागितली. त्याने म्हटलेले शब्द परत घेतले आणि माफी मागितली. ‘माझ्या सेमिनारमधील काही शब्दांमुळे काही लोक दुखावले गेले आहेत. आमचे सेमिनार व्यावसायिक आहेत. हे शो खूप वेळ चालतात. मी फक्त एकच सांगतो, माझ्या मनापासून. कोणाला वाईट वाटले असले असल्यास क्षमस्व. माफ करा, मनापासून माफी मागतो.
राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल
राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणात हस्तक्षेप केला. त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांना त्या व्हिडिओची सत्यता तपासण्यास सांगितले ज्यामध्ये प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब एका महिलेच्या केसांमध्ये थुंकताना दिसत आहे. आयोगाने उत्तर प्रदेश पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आम्ही याचा तीव्र निषेध तर करतोच पण या व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासता यावी यासाठी तुमचा तात्काळ हस्तक्षेप हवा आहे.”
महिला आयोगाच्या म्हणण्यानुसार, ही घटना केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या कोविडवरील मार्गदर्शक तत्त्वांचेही उल्लंघन करणारी आहे आणि अशा परिस्थितीत लोकांमध्ये थुंकणे हा देखील दंडनीय गुन्हा आहे. आयोगाने जावेद हबीब यांनाही सुनावणीसाठी नोटीस पाठवली आहे.