केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई बोर्डाच्या) १२ वीच्या निकालांमध्ये वाणिज्य शाखेमधून देशातून पहिला येणाऱ्या विनायक माल्लाइ या विद्यार्थ्याला रविवारी आकाश ठेंगणं झालं होतं. कारणही तसं खास होतं. पहिला आल्याबद्दल त्याला थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केला होता. नेरिमागल्लम येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या विनायकचे वडील हे रोजंदारीवर काम करतात. मात्र विनायकने त्याची आर्थिक परिस्थिती कधीच अभ्यासाच्या आड येऊ दिली नाही. विनायकसंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रविवारी पार पडलेल्या मन की बात या कार्यक्रमामध्ये मोदींनी विनायकबरोबर साधलेल्या संवादाची क्लिक चालवण्यात आली. एर्नाकूलम आणि इड्डूकी जिल्हाच्या सीमेजवळ असणाऱ्या गावात राहणाऱ्या विनायकला पंतप्रधानांचा फोन आल्याचे समजले तेव्हा खूप आनंद झाला. “तो सर्वात आनंदाचा क्षण होता,” असं विनायक सांगतो. या संभाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी विनायकला तू भारतामधील किती राज्यांमध्ये फिरला आहेस असा प्रश्न विचारला. त्यावेळी विनायकने केरळ आणि तामिळनाडू असे उत्तर दिले. पंतप्रधान मोदींनी विनायकला दिल्लीला येण्याचे आमंत्रण दिली. यावर विनायकने आपण उच्च शिक्षणासाठी दिल्ली विद्यापिठाअंतर्गत दाखला घेणार असल्याचे सांगितले.

भविष्यात बोर्डाची परीक्षा देणाऱ्यांना काय सल्ला देशील असा प्रश्न जेव्हा विनायकला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचारला त्यावर विनायकने ‘कष्ट आणि वेळेचे योग्य नियोजन’ असं उत्तर दिलं. तसेच यावेळी विनायकने त्यांच्या शाळेच्या आवारामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरण्यात बंदी आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितलं. यावर पंतप्रधान मोदींनी या नियमाचे कौतुक करत, ‘तू नशिबवान आहेस’ अशी प्रतिक्रिया दिली. याशिवाय विनायकने आपण बॅडमिंटन खेळतो असंही पंतप्रधानांना सांगितलं. यासाठी मला शाळेतून प्रशिक्षणही मिळतं असं विनायक म्हणाला.

विनायकला ५०० पैकी ४९३ गुण मिळाले असून त्याने अकाउंटन्सी, बिझनेस स्ट्रडीज आणि इन्फॉर्मेशन प्रॅक्टीसेसमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात कार्यक्रमात विनायकबरोबर मोदींच्या गप्पांची क्लिप चालवण्यात आल्यानंतर त्याला अनेकांनी फोन केले. यामध्ये विनायकच्या शिक्षकांपासून मित्रांपर्यंत आणि अनेक स्थानिक नेत्यांपर्यंत सर्वांचाच समावेश होता. अभिनय क्षेत्रातून राजकारणाकडे वळालेला सुरेश गोपी यानेही विनायकला फोन करुन शुभेच्छा दिल्या.