तुम्हाला ‘क्वीन’ चित्रपट आठवतोय? आयुष्यातल्या कठीण प्रसंगातून जात असलेली रानी यातून बाहेर पडण्यासाठी एकटीच हनिमूनला जायला निघते. हा प्रवास तिच्यासाठी अतिशय गरजेचा आणि रिफ्रेशिंग असतो. मात्र हा प्रवास चांगला होण्यासाठी अनेक गोष्टी जुळून येणे गरजेचे असते. पण पडद्यावर ज्या गोष्टी छान वाटतात तसे चांगले अनुभव प्रत्यक्षात येतील असे नाही. मुंबईमध्ये राहणारी ही ३२ वर्षांची खुशबू कौशल ही महिला आपल्या सुटीचा आनंद लुटण्यासाठी जॉर्जियामध्ये गेली होती. मात्र तिथे तिला अतिशय वाईट अनुभव आल्याने तिला प्रवासाची भिती बसली.
तिच्याकडे व्हीसा, नोकरी करत असलेल्या कंपनीचे सुटीवर असल्याचे पत्र, बँक स्टेटमेंट, हॉटेल बुकींग आणि आरोग्य तसेच प्रवासाचा विमा देखील होता. तरीही तेथील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तिला आपल्या देशात परत जा असे सांगितले. विमानतळावर या अधिकाऱ्यांनी तिला खूप वेळ चौकशीसाठी थांबवून ठेवल्याने ती भुकेली, तहानलेली राहिली. असे तिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. तिच्याकडे आवश्यक ती सर्व कागदपत्रे असूनही तिला अशी वागणूक दिल्याबद्दल तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
आपल्या या अनुभवाविषयी खुशबूने परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना ट्वीट केले असता त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याचे ती म्हणाली. याआधी मी दुबई आणि थायलंडला गेले होते या दोन्हीही ट्रीपचा अनुभव अतिशय चांगला असल्याचे तिने म्हटले आहे. यासंदर्भात तिने जॉर्जियाचे राजदूत आर्चिल यांना फेसबुकवरुन एक पोस्टही लिहीली असून त्यात तिने घडलेली सर्व घटना सांगितली आहे. माझ्यासारखेच इतरही दोन भारतीय पुरुषांना याठिकाणी थांबवून ठेवल्याचेही ती म्हणाली. तिच्या या पोस्ट फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.