आलिया शागयीवा हे नाव सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. किर्गिस्तानच्या पंतप्रधानांची मुलगी असलेल्या आलियाने मोठ्या प्रमाणात जनतेचा रोष आपल्यावर ओढवून घेतला आहे आणि या रोषाचं कारण म्हणजे तिने सोशल मीडियावर अपलोड केलेला फोटो. आलियाने आपल्या छोट्या मुलाला स्तनपान करतानाचा फोटो शेअर केला होता ज्यामुळे तिच्यावर खूप टीका होत आहे. ”माझ्या मुलाला भूक लागली तर कधीही आणि कुठेही मी स्तनपान करेन” अशी ओळ तिने आपल्या फोटोवर लिहिली होती. पण लोकांनी मात्र या फोटोवर आक्षेप नोंदवला आहे, तिने असे फोटो टाकणं म्हणजे लाजीरवाणी बाब आहे. यात तिने अंगप्रदर्शन वाजवीपेक्षाही जास्त केलंय, अशी टीका तिच्यावर केली. खुद्द पंतप्रधानांनी देखील यावर आक्षेप नोंदवला होता. तेव्हा या फोटोमुळे मोठ्या प्रमाणात रोष ओढवून घेतल्यानंतर आलीयानं हा फोटो त्वरीत काढून टाकला पण ज्या लोकांनी तिच्यावर टीका केली त्यांना सडेतोड उत्तर द्यायला ती विसरली नाही.
‘माझ्या मुलाला भूक लागली आणि मी स्तनपान केलं तर काय बिघडलं? त्याची भूक भागवणं हे आई म्हणून माझं कर्तव्य आहे. पण लोकांनी ते न पाहता याचा संबध अश्लिलतेशी जोडला. लोकांना या फोटोत आईचं प्रेम दिसण्यापेक्षा त्यांनी माझ्या शरीराचा संबध कामभावनेशी जोडला हे खूप चुकीचं आहे. अशा हिन बुद्धीच्या आणि खालच्या पातळीचे विचार असणाऱ्यांची मला किव करावीशी वाटते.’, असं सडेतोड उत्तर तिने दिले. आलिया फक्त वीस वर्षांची आहे. एकीकडे तिच्या या पुढारलेल्या विचारांवर तिच्याच देशात टीका होत असली तरी इतरांनी मात्र तिचं कौतुक केलंय.