Leopard Viral Video: जंगलातील प्राणी, जसे की वाघ, सिंह, बिबट्या यांची दहशत माणसांबरोबरच इतर प्राण्यांनाही वाटते. अशा जंगली प्राण्यांपासून कोणीही चार हात लांबच राहतं. बिबट्या शिकारीसाठी कोणावरच दया दाखवत नाही; मग तो माणूस असो वा प्राणी. अनेकदा जंगलाशेजारी असलेल्या गावात, वस्तीत बिबट्याचा वावर असतो आणि वेळ साधून बिबट्या बरोबर आपली शिकार करतो. सध्या असाच काहीसा धक्कादायक प्रकार एका ठिकाणी घडलाय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका धक्कादायक घटनेत एका घराच्या आवारात एक बिबट्या शिरला आणि तिथून त्याने एक पाळीव कुत्रा उचलून नेला. ही संपूर्ण घटना घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप फिरत आहे. या व्हिडीओत बिबट्या कुत्रा उचलून नेत असल्याचे स्पष्ट दिसते.
व्हायरल झालेली ही गंभीर घटना कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यातील मळवळी तालुक्यातील मोलदोड्डी गावात घडली आहे, अशी माहिती आहे. ही घटना समोर आल्यानंतर गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे. सुदैवाने रात्री सुमारे १ वाजता ही घटना घडली, तेव्हा तिथे कोणताही गावकरी उपस्थित नव्हता.
व्हायरल व्हिडीओ
माहितीनुसार, बिबट्याने घराच्या कंपाउंडच्या भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला आणि कुत्र्यावर हल्ला केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या सहज घरात शिरताना आणि काही सेकंदात कुत्रा घेऊन तिथून पळून जाताना दिसतो आहे. हे घर लिंगराजू यांचे असल्याची माहिती आहे. कुत्रा घराच्या दरवाज्यासमोर झोपलेला असताना बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @unscripted_with_mahesh या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला २३ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
बिबट्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, गेट बंद केले नव्हते का?, तर दुसऱ्याने ”बापरे, खूपच धक्कादायक आहे हे” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “यात मालकाची चूक आहे, कुत्र्याला आत ठेवलं पाहिजे होतं, बिबट्याचे हल्ले होत असताना बाहेर का ठेवायचं?”
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. ही पहिलीच घटना नाही, याआधीही या गावात एका बिबट्याने शेळीवर हल्ला करून तिला ठार केल्याची माहिती आहे. जंगलाजवळ राहणाऱ्या शेतकरी आणि कुटुंबांमध्ये बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे भीती आणि घबराट वाढली आहे.
गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि त्यांनी वनविभागाकडून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बिबट्याला लवकर शोधून पकडावे, नाहीतर तो गावातील एखाद्या व्यक्तीला इजा करू शकतो.