तुम्हाला इंडोनेशियामध्ये ‘जंबान कॅफे’ आठवतोय का? अहो तोच कॅफे जिथे कमोडमध्ये जेवण वाढलं जातं. म्हणजे आतापर्यंत केळीच्या पानांत, सोन्या- चांदीच्या ताटांत, चिनी मातीच्या चकचकीत अन् गुळगुळीत ताटांत हॉटेल्समध्ये जेवण वाढलेले तुम्ही पाहिले असतील. पण कमोडमध्ये जेवण वाढलेलं तुम्ही ऐकलंही नसेल आणि पाहिलंही नसेल. ‘कमोडमध्ये जेवायचं’ एवढं ऐकूनही किती किळसवाणं वाटतं ना! जेवण तर दूरच राहिलं, पण तरीही या संकल्पनेला खूपच जास्त प्रतिसाद मिळाला. आणि याच कमोड कॅफेपासून प्रेरणा घेत लिआन या तरूणीने कॅनडामध्येही असंच हॉटेल सुरू केलंय.

कोणेएकेकाळी तिने जंबान कॅफेला भेट दिली होती आणि तेव्हापासून आपणसुद्धा असं हटके हॉटेल सुरू करण्याचं खुळ तिच्या डोक्यात भरलं आणि तिने सुरू केला ‘poop cafe’. आता याचा अर्थ काय हे वेगळं सांगायला नको. जेवताना आपण ज्या जागेचं नावही काढतं नाही किंवा कोणी तसलं काही बोललं तरी एक घासही गळ्याखाली उतरत नाही तिथे जेवणं तर दूरच राहिलं. पण लिआनने आपलं हॉटेल असं बनवलं आहे की जिथे प्रत्येक गोष्ट फारच विचित्र आहे. इथे बसण्याच्या खुर्च्यासुद्धा कमोडपासून बनवल्या आहेत. हे ही थोडकं की काय जेवणाची भांडी, वाट्यांपासून कपसुद्धा कमोडच्या आकाराचे आहेत. इतकंच कशाला इथल्या गोड पदार्थांचा आकारही असा बनवला आहे की ते खावं की न खावं असा विचार तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही.

आता इंडोनेशियामध्ये सुरू करण्यात आलेल्या जंबान कॅफेमागे काहीतरी हेतू होता. जंबानचा इंडोनेशिअन भाषेत अर्थ होतो शौचालय. इंडोनेशियातील अनेक भागांत शौचालय नाहीत. त्यामुळे लोकांनी शौचालयाचा अधिक वापर करावा, यासाठी जनजागृती म्हणून आपण अशा प्रकारचे हॉटेल उघडल्याचे मालकाने सांगितले. आता त्यानंतर इस्लाम धर्मांची मुल्ये पायदळी तुडवल्याबद्दल या हॉटेलवर टीका झाली ती वेगळी गोष्ट आहे. पण कॅनडामध्ये थोडी उलट स्थिती पाहायला मिळाली इथे तिच्या हॉटेलला तुफान प्रसिद्धी मिळताना दिसतेय.