फिफा विश्वचषक २०२२ च्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करून ३६ वर्षानंतर जेतेपद पटकावलं. या सामन्यात सिंहाचा वाटा असलेला अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्नही पूर्ण झालं. लिओनेल मेस्सी आणि फ्रान्सचा किलियन एमबाप्पे यांच्यात रंगतदार लढत झाली पण अखेरीस मेस्सीने बाजी मारली. अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक जिंकल्यानंतर जगभरात जल्लोष करण्यात आला. मेस्सीच्या चाहत्यांनी गुलाल उधळून अर्जेंटिनाला शुभेच्छा दिल्या. एव्हढंच नाही तर सोशल मीडियावरही मेस्सीवर शुभेच्छांचा वर्षाव झाला आणि इन्स्टाग्रामवर मेस्सीचे तब्बल ४०० मिलियन फॉलोअर्स झाले. त्यामुळे जागतिक फुटबॉलचा स्टार खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डोनंतर मेस्सी इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डोचे इन्स्टाग्रामवर ५१९ मिलियन फॉलअर्स आहेत. इन्स्टाग्राम कंपनीला वगळता तो फॉलोअर्सच्या बाबतीत जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर अर्जेंटिनाचा हुकमी एक्का लिओनेल मेस्सी ४०० मिलियन फॉलोअर्सने दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे फुलबॉल क्रिडा विश्वातून एकमेव खेळाडू रोनाल्डोच्या नावावर इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्सचा विक्रम आहे. पण मेस्सीची दिवसेंदिवस वाढणारी फॅन फॉलोईंग पाहता येणाऱ्या काळात मेस्सी रोनाल्डोचा विक्रम मोडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रविवारी ५ मिलियन चाहत्यांनी लिओनेल मेस्सीला इन्स्टाग्रामवर फॉलो करणं सुरु केलं. तर मागील तीस दिवसांत त्याच्या इन्स्टाग्राम फॉलोईंगमध्ये तब्बल २० मिलियनची वाढ झालीय. बार्सिलोनच्या १८ सिजननंतर मेस्सीने ऑगस्ट २०२१ मध्ये पीएसजी क्लब जॉईन केलं. त्यावेळीही त्याच्या इन्स्टाग्रामवर २० मिलियन नवीन फॉलोअर्सची वाढ झाली, अशी माहिती सोशल ब्लेडने दिली आहे. दरम्यान, जगभरात फिफा विश्वचषकाची चर्चा रंगली असतानाच सोशल मीडियावरही लिओनेल मेस्सी आणि किलियन एमबाप्पे यांच्यावर भन्नाट मिम्स व्हायरल होत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एमबाप्पेने एक गोल जास्त करून गोल्डन बुटच्या शर्यतीत मेस्सीचा पराभव केला. परंतु, मेस्सीलाही फिफा विश्वचषकात अप्रतमि कामगिरी केल्यामुळं गोल्डन बॉलने सन्मानित करण्यात आलं. या दोघा स्टार खेळाडूंनी मैदानात दाखवलेली जादू इंटरनेटवर अनेकांना थक्क करुन गेली. विशेष म्हणजे, दोघेही पीएसजी फुटबॉल क्लबसाठी खेळतात. दरम्यान, अर्जेंटिना आणि फ्रान्समध्ये झालेला फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना इंटरनेटवर धुमाकूळ घालून गेला आहे. मेस्सी आणि एमबाप्पे यांच्यावर ट्विटरवर भन्नाट मिम्स व्हायरल केले जात आहेत.