काश्मीरमध्ये सध्या पाऊस आणि जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. बर्फ वितळल्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झालीये. चिखलाने माखलेले रस्ते दाखवण्यासाठी काश्मीरची एक चिमुकली मुलगी रिपोर्टर बनली आहे. तिने एक व्हिडीओ शेअर करत परिसरातील चिखल आणि खड्ड्यांमुळे खराब झालेल्या रस्त्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

काश्मीरमधील ही चिमुकली रस्त्यांची आणि उपनगरांची दयनीय अवस्था दाखवण्यासाठी रिपोर्टर बनली आहे. या चिमुरडीने आपल्या रिपोर्टिंगने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. नेटकरी तिने केलेल्या या कव्हरेजबद्दल तिची जोरदार प्रशंसा करत आहेत. गुलाबी रंगाचे जॅकेट घातलेली ही मुलगी परिसरातील खराब रस्ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तिचे नाव आणि ती ज्या ठिकाणी व्हिडिओ शूट करत होती ते ठिकाण निश्चित होऊ शकले नाही. परंतु हा व्हिडीओ काश्मीरचा असल्याचं म्हटलं जातंय. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहु शकता की ती मुलगी तक्रार करत आहे, की रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे पाहुणे तिला भेटायला घरी येऊ शकत नाही.

ही चिमुकली तिच्या कॅमेरा सांभाळणाऱ्या आईला रस्त्यावरील खड्डे दाखवायला सांगते. चिखल आणि पावसामुळे परिस्थिती कशी बिकट झाली आहे, हे ही मुलगी सांगते. मोबाईल फोनवर शूट केलेल्या २.०८ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये खड्डे दाखवत ती रस्त्यावरून पुढे जाते. लोक कसे रस्त्यावर कचरा फेकतात आणि त्यामळे सगळं कसं घाण झालंय, हेही ती सांगते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ही उत्साही छोटी रिपोर्टर दर्शकांना तिचे चॅनेल ‘लाइक, शेअर आणि सबस्क्राईब’ करण्यास सांगतीये आणि पुढील व्हिडीओमध्ये पुन्हा भेटू असं सांगतीये. हा व्हिडीओ अनेक ट्विटर युजर्सनी शेअर केला असून एक लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.