Dog Vs Crocodile: एक क्षणात सगळं बदललं… एकीकडे मालकाच्या सुरक्षेसाठी धावणारा एक निष्ठावान कुत्रा, तर दुसरीकडे भक्ष्याच्या प्रतीक्षेत शांत; पण काळाचा घाला घालण्याची क्षमता असलेली घातक मगर. काही क्षणांनंतर जे घडतं, ते इतकं धक्कादायक आहे की, श्वास रोखला जातो. हा व्हिडीओ केवळ एका प्राण्याची साहसकथा नाही, तर त्याची मालकाप्रति अतीव निष्ठा, प्रेम दाखवून देणारी आणि क्षणात सर्व काही बदलून टाकणाऱ्या नियतीची झलक आहे. जेव्हा मगरीने एकाच झटक्यात कुत्र्याचा सगळा जोश संपवला, तेव्हा काय झालं असेल? व्हिडीओ पाहून नक्कीच अंगावर काटा येईल…
सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही व्हिडीओ हसवतात, काही रडवतात; पण काही असे असतात की, जे थेट आपल्या काळजाला भिडतात. असाच एक व्हिडीओ सध्या लाखोंनी डोळ्यांत साठवून ठेवला आहे, ज्यात एक निष्ठावान कुत्रा आपला जीव धोक्यात घालून, मालकाला मगरीपासून वाचवण्याचा प्रयत्न करतो; पण पुढचं दृश्य पाहून अंगावर काटा येतो.
व्हिडीओची सुरुवात एका माणसापासून होते, जो स्टीलच्या रॉड आणि चिमट्याच्या साह्याने एका भल्या मोठ्या मगरीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असतो. सुरुवातीला सर्व काही नियंत्रणात दिसतं; पण अचानक फ्रेममध्ये एक कुत्रा उडी मारताना दिसतो. कदाचित त्याला वाटलं असेल, की त्याचा मालक संकटात आहे आणि तो ‘हीरो’सारखा मगरीवर धावून जातो.
कुत्रा कधी भुंकतो, कधी मगरीची शेपटी ओढतो…
कुत्र्याच्या प्रत्येक हालचालीतून त्याचं धाडस दिसतं; पण काही क्षणांतच त्याचा भ्रमनिरास होतो. मालकाची पकड सैल होताच मगर ‘डेथ रोल’ करीत कुत्र्याला एका झटक्यात जबड्यात पकडते. ते दृश्य इतकं वेगवान आणि धक्कादायक असतं की, पाहणाऱ्याचे श्वासही थांबतात. कुत्रा केकाटतो, सुटण्याचा प्रयत्न करतो; पण मगरीच्या कराल जबड्यातून सुटणे म्हणजे महाकठीण गोष्ट. व्हिडीओ नेमका याच उत्कंठा रोखणाऱ्या क्षणावर येऊन थांबतो आणि मन सुन्न झालेले प्रेक्षक पुढे काय झालं असेल, या हतबल अवस्थेतच विचारमग्न होतात.
@foodiechina_ या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे.
कोणीतरी कुत्र्याच्या धाडसाला सलाम केला, तर कुणी मालकाच्या बेफिकिरीवर प्रश्न उपस्थित केले. एक युजर म्हणतो, “मगर म्हणजे पाण्यातला थानोस आहे… त्याच्याशी पंगा घेणं म्हणजे स्वतःचं नुकसान.” तर दुसरा म्हणतो, “डोगेशला वाटलं की, तो सलमान आहे; पण मगरीनं दाखवून दिलं हीरो कोण असतो ते”
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
हा प्रसंग स्पष्ट करतो की, धाडस करताना केवळ भावनिक आवेगावर नाही, तर बुद्धीनंही निर्णय घेणं गरजेचं असतं. धोका किती मोठा आहे, हे समजून घेणंही महत्त्वाचं असतं.