आफ्रिकेमधील मादागास्कर या देशामध्ये एका बचाव कार्यदरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये बचावाकार्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टरच समुद्रात कोसळलं. या हेलिकॉप्टरमध्ये देशातील पोलीस विषयक मंत्रालयाचे मंत्री सर्ज गेले सुद्धा होते. हेलिकॉप्टर क्रॅशन झाल्यानंतर सर्ज गेले यांनी जवळजवळ १२ तास समुद्रामध्ये पोहत स्वत:चा जीव वाचवला. समोर आलेल्या माहितीनुसार देशाच्या ईशान्येला असणाऱ्या समुद्रकिनारी एका प्रवासी जहाज बुडालं. त्या जहाजामधील लोकांना वाचवण्यासाठी मोहीम सुरु होती. जहाजामधील ३९ जणांना जलसमाधी मिळाली मात्र ९० हून अधिक जणांना वाचवण्यात यश आलं. पण या बचाव कार्यादरम्यान एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला आणि ते समुद्रामध्ये कोसळलं.
मादागास्करमधील एका मंत्र्यांने दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर सर्ज आणि त्यांच्या एक जोडीदार समुद्रामध्ये पडले. त्यानंतर या दोघांनी जवळजवळ १२ तास पोहत समुद्रकिनारा गाठला. समुद्रकिनाऱ्यावर आल्यानंतरचा सर्ज यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. माझ्या मरणाची वेळ अजून जवळ आलेली नाही असं सर्ज म्हणताना दिसत आहे. या दुर्घटनेमध्ये हेलिकॉप्टरमधील सर्वजण वाचले आहेत.
देशाचे राष्ट्रपती एंड्री राजोएलिना यांनी मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी शोक संदेश जारी केला आहे. या जहाजाचा आणि नंतर त्यामधील प्रवाशांना वाचवण्यासाठी गेलेल्या हेलिकॉप्टरचा अपघात कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र सर्ज यांच्या हेलिकॉप्टरचा सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता अपघात झाल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता आपल्या सहकाऱ्यासोबत पोहत पोहत महंबो समुद्रकिनाऱ्यावर पोहचले. “मला कोणतीही जखम झालेली नाही. मात्र मला फार थंडी वाजतेय. तुम्ही माझ्या कुटुंबियांसाठी आणि सहकाऱ्यांसाठी तसेच सरकारी यंत्रणांसाठी माझा व्हिडीओ शूट करुन तो प्रसारित करावा. मी जिंवत आहे हे त्यांना कळणं गरजेचं आहे,” असं महंबोमधील गावकऱ्यांना सांगितलं.
सर्ज यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये मंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. ते मागील तीन दशकांपासून पोलीस सेवेत आहेत.