पोटगी देण्यास आर्थिकदृष्ट्या असमर्थ असल्यानं मध्य प्रदेशमधल्या एका व्यक्तीवर आपली किडनी विकण्याची वेळ आलीय. ‘किडनी विकणे आहे’ अशी जाहिरात केलेला फलक घेऊन तो रस्त्यावर फिरत आहे. पोटगीपोटी त्याला पत्नीला दरमहा २, २०० रुपये द्यावे लागतात. पण त्याची आर्थिक परिस्थिती नाही. न्यायालयाच्या आदेशापुढे आपण हतबल आहोत असं सांगत त्याने किडनी विकण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रकाश अहिरवार हे प्लंबर म्हणून काम करतात. २००२ मध्ये त्यांचं लग्न झालं. २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांची पत्नी आठवी शिकली होती. ‘तिला शिक्षणाची आवड असल्याने आपण तिला शिकवले. तिने बीएडपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण झाल्यानंतर ती एका खासगी कंपनीत नोकरी करायला लागली. सारं काही सुरळीत सुरु होतं पण एकेदिवशी अचानक मला घटस्फोट हवाय असं सांगून तिने मानसिक धक्का दिल्याची माहिती प्रकाशने ‘इंडिया टुडे’ला दिली. त्यांचा घटस्फोट झाला असून पत्नीला दरमहा २,२०० रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने त्यांना दिले. सुरुवातीला जमीन विकून मिळालेल्या पैशांतून काही महिने आपण तिला पोटगी दिली. पण आता आपल्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे किडनी विकण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.