अमरनाथ यात्रेवरुन परतणाऱ्या भाविकांच्या बसवर सोमवारी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून निषेध केला. यावेळी काश्मिरी जनतेविषयी त्यांनी एक ट्विट केले आणि ट्विटरवर राजनाथ सिंहांविरोधात संतापाचा उद्रेक झाला. त्यांच्या या ट्विटवर देशभरातून नकारात्मक प्रतिक्रिया येत असताना ‘मेक माय ट्रिप’च्या एका महिला कर्मचाऱ्यानेही यावर टीका केली. ही टीका करताना तिने आपल्या ट्विटमध्ये अपशब्दही वापरले. त्यामुळे या महिलेची नोकरी धोक्यात आली आहे.

या महिला कर्मचाऱ्याने केलेले ट्विट राजनाथ सिंह यांच्या निदर्शनास आले. त्यावर राजनाथ यांनी त्यांना उत्तर दिले. या संपूर्ण प्रकरणानंतर मेक माय ट्रिपने एक पत्रक जारी करून या महिला कर्मचाऱ्याने केलेल्या ट्विटशी आपला कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण दिले. ‘हे तिचे वैयक्तिक मत असून त्याचा कंपनीशी काहीही संबंध नाही. तरीही तिने वापरलेल्या अपशब्दाबद्दल आपण माफी मागतो’ असं मेक माय ट्रिपने पत्रकात म्हटले.

वाचा : मिताली राजचं कौतुक करताना कोहलीची ‘विराट’ चूक

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरवर अमरनाथ यात्रेविषयी ट्विट केले होते. ‘अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्याचा काश्मिरी जनतेने निषेध केला. असे करून काश्मिरी जनतेने त्यांच्यातील कश्मिरीयत अजूनही जिंवत ठेवलीय’ अशा प्रकारचे ट्विट त्यांनी केलं. या ट्विटवरून त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. यावेळी मेक माय ट्रिपच्या पोर्टल एडिटर शुचि सिंह कालरा हिने एक ट्विट केले. ‘अशा परिस्थितीतही काश्मिरियतची चिंता आहे. फक्त सांत्वन करत बसण्यापेक्षा भ्याड हल्ला करणाऱ्यांना आधी पकडा आणि शिक्षा द्या’ असे ट्विट शुचिने केले होते. यावेळी तिने आपल्या ट्विटमध्ये अपशब्द देखील वापरले होते. शुचि यांचे ट्विटर अकाऊंट व्हेरिफाईड असल्याने राजनाथ सिंह यांच्या ते लगेच निदर्शनास आले आणि त्यांनी त्या ट्विटला उत्तर दिले होते.

वाचा : राजनाथ सिंहच्या ट्विटवर भडकले लोक, त्यापेक्षा मुस्लिम धर्म स्विकारू

‘प्रत्येक काश्मिरी हा दहशतवादी नसतो, देशाच्या प्रत्येक भागात शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करणे हे माझे कर्तव्य आहे’ असे उत्तर त्यांनी शुचिला दिले. ट्रोलिंगचे हे प्रकरण गाजल्यानंतर मेक माय ट्रिपने हा खुलासा केला आहे. या ट्विटनंतर शुचिला नोकरीवरून काढून टाकल्याची चर्चाही सोशल मीडियावर होती. पण एका वृत्तवाहिनीने या वृत्ताचे खंडन केले आहे.