मुंबई असं शहर आहे जिथे प्रत्येकजण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतो. कोणाला पैसे कमावायचे असतात तर कोणाला या स्वप्ननगरीत आपल्या स्वप्नांचा बंगला बांधायचा असतो. तर कोणाला या मायानगरीत ध्रुवताऱ्यासारखी आपली ओळख बनवायची असते. हे शहर येथे येणाऱ्या प्रत्येकाला काहीना काही शिकवतं. जो मेहनत करतो आणि संघर्षाच्या काळातही या शहरात तग धरुन राहतो त्याला मुंबई आयुष्यात खूप काही देऊन जाते. येथे येणाऱ्या प्रत्येकाची एक गोष्ट असते. अशी गोष्ट की इथल्या प्रत्येकाला जगण्यासाठी ती नवी प्रेरणा देत असते. अशाच काही गोष्टींचं संकलन ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या फेसबुक पेजवर पाहायला मिळतं.

या अनेक गोष्टींपैकी एका यशस्वी हेअर ड्रेसरची गोष्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फुटपाथवर राहण्यापासून ते बॉलिवूडच्या कलाकारांसाठी काम करण्यापर्यंतचा त्याचा प्रवास हा खरंच प्रेरणादायी होता, या प्रवासाची गोष्ट त्याने जशी सांगितली ती शब्दांत मांडण्याचा प्रयत्न आम्ही केलाय.

‘रत्नागिरीतल्या छोट्याशा गावात माझा जन्म झाला. मी दहावी नापास झालो होतो. माझ्या घरातले प्रत्येक जण केस कापण्याचे काम करायचे. या व्यवसायातून माझी आर्थिक स्थिती सुधारेल असं मला वाटतं नव्हतं. तेव्हा मी थेट मुंबईचा रस्ता धरला. दहिसरमधल्या एका पार्लरमध्ये मी नोकरी करायचो. मला आजही आठवतं माझे चुलत भावंडं यावरून माझी खूप थट्टा मस्करी करायचे. ज्याला हिंदीच काय मराठीही नीट बोलता येत नाही तो इथे काय टिकणार असं म्हणत ते माझी टर उडवायचे. पण मी माझं काम करतच राहिलो. मुंबईत माझ्याकडे राहायला घर नव्हतं. मी फुटपाथवर राहायचो, तिथेच आंघोळ करायचो. किती भयंकर होते ते दिवस. पण मी जिद्द सोडली नाही. मी माझं काम करतच राहिलो. एके दिवशी एका मोठ्या पार्लरमधून मला नोकरीची संधी चालून आली. तेव्हा माझ्या अंगावर चांगले कपडेही नव्हते. माझ्या अंगावरचे फाटके कपडे पाहून ते मला नोकरी देणार नाही, असं मला वाटत होतं. पण सुदैवाने त्यांनी माझ्या कपड्यांकडे न पाहता माझ्या कामाकडे पाहून मला नोकरी दिली. मुंबईतल्या हायफाय पार्लरमध्ये मी रूजू झालो. तिथे अनेकदा विदेशी लोक यायचे. माझ्याशी इंग्रजीत संवाद साधायचे, तेव्हा इंग्रजी येत नसल्याने माझी चांगलीच पंचाईत व्हायची. पण मी तिथे राहून राहून संवाद साधण्याएवढं तोडकं मोडकं इंग्रजी शिकलो. या प्रवासात सोनम कपूर, अभय देओल यांच्यासोबत काम करण्याची संधीही मला मिळाली. कोणे एके काळी मी रस्त्यावर राहायचो आणि आता मुंबईत माझं स्वत:चं घर आहे. पूर्वी खिशात एक पैसा नव्हता पण आज घर चालवण्याएवढे पैसे मी कमावतो. या शहरात संघर्ष नक्की आहे पण येथे टिकून राहिलात आणि स्वत:वर विश्वास ठेवला तर या शहरात येणार प्रत्येक माणूस यशस्वी होतो. ही गोष्ट मला या शहराने शिकवली’
ह्युमन्स ऑफ बॉम्बेने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.