अतिथी देवो भव:! आपल्याकडे आलेले अतिथी देवाचे रुप आहेत तेव्हा त्यांच्याशी सौजन्याने वागले पाहिजे, पण कधी कधी या पाहुण्यांच्या वागण्याचा फार अतिरेक होतो अन् मनावरचा ताबा सुटतो. पण थायलंडमधल्या या माणसाने मात्र अशाही परिस्थितीत आपल्या मनावर ताबा ठेवत जी काही सहनशीलता दाखवली त्याचं कौतुक करावं तेवढं कमी.
हा २१ वर्षांचा प्रवासी बसने प्रवास करत होता. आता आधिच बाहेर एवढा उकाडा त्यात बसमध्ये बसून सहा तासांचा प्रवास म्हणजे त्याला अगदीच नकोसा झाला होता. यातच एका महिला प्रवश्याने त्याचा प्रवास अधिकाअधिक वाईट कसा होईल याची पुरेपुर खबरदारीच घेतली होती. प्रवासात तिने आपले पाय त्याच्या शेजारच्या सीटवर ठेवले. तिच्या पायात असणा-या मोज्यांच्या वासाने त्या बिचा-याला त्रास होऊ लागला. आता मोज्यांच्या वास किती घाणेरडा येतो हे वेगळं सांगायला नको तेव्हा बिचा-या या तरूणाने या महिलेला पाय खाली घ्यायला सांगितले पण याला ती भिक थोडीच घालतेय. वारंवार विनंती करूनही ती काही पाय खाली घ्यायला तयार नव्हती. आता मागे बसली होती फ्रेंचहून थायलँड फिरायला आलेली पाहुणी, भले चुकीची वागत असली तरी तिच्याशी वाद कसा घालणार म्हणून सरळ सहनशीलतेचा आणि गांधीगिरीचा मार्ग त्याने अवलंबला.
काही केल्या महिला ऐकत नाही म्हटल्यावर त्याने आपला फोन बाहेर काढून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. वरून ही महिला तिच्या देशात असती तर अशीच वागली असती का? अशी ओळ लिहिली होती. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.