इंडिगो एअरलाइन्स मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. अलीकडेच या एअरलाइन्सने त्यांच्या ऑनबोर्ड सेवेत मोठे बदल केले, ज्यानुसार आता इंडिगो फ्लाइटमध्ये प्रवाशांसाठी कॉफी आणि चहाची स्वतंत्रपणे विक्री बंद केली. ज्यामुळे जेवणासोबत कॉम्बोमध्ये पेय खरेदी करावी लागत आहेत. पण, एअरलाइन्सच्या या निर्णयावर आता प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

एका प्रवाश्याने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) एक भलीमोठी पोस्ट करत इंडिगो एअरलाइन्समधील जेवणासंदर्भात त्याचा अनुभव शेअर करत संताप व्यक्त केला आहे. या युजरने म्हटले की, इंडिगो एअरलाइन्समध्ये प्रवासी यापुढे कॉफी किंवा चहासारखे स्वतंत्र पेय ऑर्डर करू शकत नाहीत. कारण यासाठी त्यांना नाश्त्याचा पर्याय निवडण्याची सक्ती केली आहे. मग तुमची इच्छा असो वा नसो, तुम्हाला चहा, कॉफी हवी असल्यास त्यासाठी नाश्त्याचा पर्याय निवडावा लागेल.

एक्स युजर @DPrasanthNair या युजरने त्याचा अनुभव शेअर करत इंडिगोच्या स्नॅक्स मेनूचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यात कोणतेही पेय कॉम्बो सेटमध्येच विकत घेता येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

या युजरने इंडिगो फ्लाईटमधील त्यांचा अनुभव शेअर करत लिहिले की, ‘अलीकडेच इंडिगो एअरलाइन्समधून प्रवास केला, पण ते चहा/कॉफी स्वतंत्रपणे विकत नाहीत हे जाणून मला आश्चर्य वाटले. अनेक प्रवाशांना फक्त चहा/कॉफी घ्यायची असेल तरी त्यांना नाश्ता + पेय यासाठी २००/- रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजे एका चहा किंवा कॉफीची किंमत २००/- रुपये असेल.

“एअरलाइन्सला फक्त नफा कमवायचाय’, युजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया

या पोस्टने सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले, ज्यावर आता अनेक युजर्सनी इंडिगो एअरलाइन्समधून प्रवास करतानाचा त्यांचा अनुभव शेअर केला आहे. एका युजरने लिहिले की, ‘ते तिकीट विकण्यापेक्षा खाद्यपदार्थ विकून जास्त पैसे (नफा) कमावतात.’ दुसऱ्या एका युजरेन लिहिले की, एअरलाइन्स कंपनी तुम्हाला काय पाहिजे याचा नाही, तर त्यांना कशात फायदा आहे याचा विचार करते. ‘

अनेक युजर्सनी काही सूचनाही केल्या. एका युजरने लिहिले की, ‘गेटजवळच्या कॉफी शॉपमधून कॉफी खरेदी करा आणि फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी प्या.’ दुसर्‍याने लिहिले की, ‘सोपा उपाय, मी गिरनार चहाचा १०/१५ रुपयांचा पाउच घेतो, तोच जो ते मिसळतात, मी गरम पाणी मागतो, जे ते पुरवायला बांधील आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंडिगोने दिली अशी प्रतिक्रिया

इंडिगोने या व्हायरल पोस्टवर प्रतिक्रिया देत लिहिले की, ‘सर, आम्ही कार्यक्षम, टिकाऊ आणि स्वस्त स्नॅक अनुभव देण्यासाठी आमच्या सेवा सुधारल्या आहेत. हा उपक्रम गो ग्रीनसाठीच्या आमच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे. आमचे ग्राहक आता फ्लाइटमध्ये खरेदी केलेल्या कोणत्याही स्नॅकसह मोफत पेयाचा आनंद घेऊ शकतात.