Alien spaceship viral video : अंतराळ, परग्रहवासी, यूएफओ म्हणजेच उडत्या तबकड्या अशा रंजक विषयांबद्दल प्रत्येक व्यक्तीला कुतूहल असते आणि त्यामुळे त्यांबाबत माहिती करून घेण्याची उत्कट इच्छा असते. या विषयांवर अनेक सिनेमे, मालिकादेखील बनविल्या गेल्या आहेत. इतकेच नव्हे, तर आजपर्यंत आपण अनेकदा परग्रहवासी त्यांच्या उडत्या तबकडीसह या पृथ्वीवर आले असल्याच्या केवळ बातम्या किंवा अफवा ऐकल्या आहेत. मात्र या सर्व गोष्टींवर पूर्णतः विश्वास ठेवण्याजोगा कोणताही ठोस पुरावा अद्याप आपल्यासमोर आलेला नाही.

मात्र, नुकताच सोशल मीडियावर एका एक्स [पूर्वीचे ट्विटर] अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला गेलाय. त्यामध्ये आकाशातून भरधाव वेगात उडणारी एक सावली दिसल्याचा आणि ती एक उडती तबकडी असल्याचा त्या वापरकर्त्याचा दावा आहे. हा प्रकार नुकत्याच ८ एप्रिलला झालेल्या सूर्यग्रहणाच्या वेळचा आहे. हे ग्रहण भारतातून पाहता आले नसले तरीही अमेरिका, कॅनडा व मेक्सिकोमध्ये ते दिसले आहे. एक्सवरील MattWallace888 नावाच्या अकाउंटने नेमके काय शेअर केले आहे ते आपण पाहू.

हेही वाचा : Solar eclipse 2024 Video : सूर्यग्रहणाने दिपले विमान प्रवाशांचे डोळे! विमानातून कसे दिसले ग्रहण; पाहा ही झलक

व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती सूर्याला लागणारे ग्रहण दाखविताना, शुभ ढगांमधून एक काळ्या रंगाची विमानसदृश सावली अतिशय भरधाव वेगाने उडत गेल्याचे आपल्याला स्पष्टपणे दिसते. काही वेळाने तशाच पद्धतीची अजून एक सावली विरुद्ध बाजूने उडत गेल्याचे दिसते. आकाशातील ग्रहण आणि ती काळी सावली पाहताच, ग्रहण पाहण्यासाठी आलेल्या सर्व लोकांना खूपच आश्चर्य वाटले असल्याचे त्यांच्या आवाजावरून लक्षात येते. या व्हिडीओला, “रेड ॲलर्ट : आज सूर्यग्रहणाच्या वेळी अर्लिंग्टन टेक्सास इथे UFO दिसल्याचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ती तबकडी ढगांमध्ये अचानक दिसेनाशी झाल्यामुळे लोक घाबरून गेले आहेत”, अशा आशयाची कॅप्शन देण्यात आली आहे.

अर्थात, या व्हिडीओमध्ये केला गेलेला दावा खरा आहे की खोटा याबद्दलचा कोणताही पुरावा नाही. मात्र, व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर नेटकरी काय म्हणतात ते पाहू.

“विमानं खूप उंचावरून उडत असतात. त्यामुळे त्यांची अशी सावली ढगांवर पडते. मीसुद्धा असा अनुभव घेतला आहे”, असे एकाने लिहिले आहे.

“जेव्हा विमान आकाशातून उडते तेव्हा त्यांची सावली ढगांवर पडते. जेव्हा आकाश निरभ्र होते तेव्हा त्यांची सावली नाहीशी होते. हवेत उडणाऱ्या विमानांवर सूर्यप्रकाश पडल्याने ढगांवर विमानाच्या आकाराएवढीच त्यांची मोठी सावली पडते. ही खूपच सामान्य गोष्ट आहे”, असे स्पष्टीकरण दुसऱ्याने दिले.

“एलियन्सना अमेरिकेला भेट देणे भारीच पसंत आहे. त्या एलियन्सना दुसऱ्या जागा माहीत आहेत की नाही?” अशी प्रतिक्रिया तिसऱ्याने दिली.

“अहो, तो यूएफओ नाही; ड्रॅगन आहे!” अशी मस्करी चौथ्याने केली.

हेही वाचा : बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video

अर्थात, व्हिडीओमध्ये दिसणारे दृश्य हे उडत्या तबकडीपेक्षा विमानाचे असण्याची सर्वाधिक शक्यता आहे याबद्दल शंका नाही. @MattWallace888 या एक्स अकाउंटने शेअर केलेल्या व्हिडीओला आतापर्यंत २३.८ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत.