‘पुढे अरुंद पूल आहे वाहने सावकाश चालवा’ अशी सुचना आपण अनेकदा प्रवासादरम्यान वाचतो. मात्र मध्य प्रदेशमध्ये नेमकं या सुचनेच्या उलटं घडलं आणि एक भीषण अपघात घडला. एका अरुंद पुलावरुन येणाऱ्या रिक्षाला होणारी धडक चुकवण्याच्या नादात एका कार अरुंद पुलावरुन पाण्यात पडली. मात्र गाडीमधील चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडीतील लहान मुलाचे प्राण वाचवले. हा धक्कादायक अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

राज्यातील निवारी जिल्ह्यामधील ओरिचा येथे हा अपघात घडला. सोमवारी (२८ ऑक्टोबर) रोजी हा अपघात घडला. एका अरुंद पुलावरुन एक रिक्षा भरधाव वेगाने जात असतानाच समोरुन एक कार आली. या रिक्षाला धडक बसू नये म्हणून गाडी डावीकडे घेण्याचा चालकाने प्रयत्न केला. या प्रयत्नामध्ये गाडी थेट नदीमध्ये कोसळली. गाडीमध्ये एक लहान मुलही होते. गाडीच्या चालकाने प्रसंगावधान दाखवत बुडणाऱ्या गाडीच्या डाव्या बाजूच्या दारावर चढून लहान मुलाला बाहेर काढले. पुलापासून काही अंतरावर गाडी बुडू लागली. त्यावेळी या चालकाने आपल्या हातातील बाळाला पुलाकडे भिरकावले. पुलावरील लोकांना त्या बाळाला पकडता आले नाही आणि ते बाळ पाण्यात पाडले. मात्र लगेच एका व्यक्तीने पाण्यात उडी मारुन बाळाला वर काढले. इतरांनी पुलावरुन एक कापड खाली टाकत या बाळाला वर घेतले. दरम्यान इतरांनी गाडीतील उर्वरित चार जणांना वाचवले. गाडीतील सर्वजण सुखरुप असून त्यांना किरोळ जखम झाली आहे. या सर्वांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

या लहान मुलाचे प्राण वाचल्याबद्दल अनेक नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

तर काहींनी हा अपघात टाळता आला असता असं मत नोंदवलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या अपघातानंतर इतरांच्या मदतीने गाडीतील पाचही जणांचे प्राण वाचले असले तरी अपघातासाठी कारणीभूत असणाऱ्या रिक्षाचालकाने पाण्यात पडलेल्या गाडीमधील प्रवाशांना मदत करण्याऐवजी घटनास्थळावरुन पळ काढला.