मारुती सुझुकीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावरुन Alto K10 ही हॅचबॅक सेगमेंटमधील आपली लोकप्रिय कार हटवली आहे. त्यामुळे कंपनीने ही कार बंद केल्याची जोरदार चर्चा आहे. मारुतीने ही कार अद्याप नव्या BS-6 इंजिनमध्येही अपग्रेड केली नाहीये. या कारशिवाय अन्य सर्व कार कंपनीने BS-6 इंजिनमध्ये अपडेट केल्या आहेत.

काही रिपोर्ट्नुसार, कंपनीच्या बहुतांश डीलर्सकडील बीएस-4 Maruti Suzuki Alto K10 गाड्यांचा स्टॉक डिसेंबर महिन्यातच संपला होता, त्याचवेळी गाडीसाठी बुकिंगही बंद करण्यात आली होती. मात्र अद्याप Alto K10 ही कार बंद केल्याची अधिकृत घोषणा मारुती सुझुकी कंपनीने केलेली नाही. तसेच, ही कार BS-6 इंजिनमध्ये अपग्रेड करणार की नाही? याबाबतही काहीही माहिती कंपनीने दिलेली नाही.

Alto K10 : कंपनीने ही कार सर्वप्रथम वर्ष 2010 मध्ये भारतीय बाजारात लाँच केली होती. त्यानंतर चार वर्षांनी म्हणजे 2014 मध्ये ही कार फेसलिफ्ट मॉडेलमध्ये लाँच झाली. यावेळी कारच्या लूक आणि फीचर्समध्ये काही बदल करण्यात आले होते. यानंतर 2019 मध्ये या कारमध्ये सुरक्षिततेसाठी एबीएस, ईबीडी, रिअर पार्किंग सेंसर्स, सीट बेल्ट रिमाइंडर, ड्रायव्हर साइड एअरबॅग आणि स्पीड अलर्ट यांसारख्या फीचर्सचा समावेश केला. मारुति ऑल्टो के10 मध्ये बीएस-4 कम्प्लायंट , 998cc क्षमतेचं K10B पेट्रोल इंजिन देण्यात आलं होतं. हे इंजिन 6,000 rpm वर 67 bhp ऊर्जा आणि 3,500 rpm वर 90 Nm टॉर्क निर्माण करते. यासोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटी गिअरबॉक्सचा पर्यायही होता. कंपनीची ही कार सीएनजी व्हर्जनमध्येही उपलब्ध होती.