लहान बाळांसोबत आपण हळुवारपणे वागतो. त्या गोंडस इवल्याशा जिवाला काही होणार नाही याची सगळ्या प्रकारे काळजी घेतो.
लहान मूल मग ते प्राण्याचंही का असेना, नेहमीचं गोंडस असतं. त्याची भाषा आपल्याला कळत नसली तरी त्या पिल्लाच्या डोळ्यातले भाव आपल्याला आपलेसे वाटतात. जगाचा अनुभव नसलेलं कुठल्याही प्राण्यांचं बाळ जसंकाही शब्दांच्या पलीकडे जात आपल्याशी संवाद साधतं.
आपल्याला जसे प्राण्यांचे भाव कळतात तसंच इतर प्राण्यांनाही इतर मुक्या प्राण्यांच्याही मदतीची हाक कळत असेल.
पाहा- धतिंग, धतिंग, धतिंग नाच!
इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओत एक माकड एका कुत्र्याच्या पिल्लाची काळजी घेताना दिसतंय. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातल्या अलाहाबादचा आहे. आपल्या आईपासून वेगळं झालेलं कुत्र्याचं हे पिल्लू अलाहाबादच्या रस्त्यात एकटं पडलेलं या माकडाला सापडलं. त्याबरोबर त्या माकडाने या पिल्लाला भर रस्त्यातून दूर केलं आणि आपल्या पिल्लाप्रमाणे ते माकड त्यांची काळजी घ्यायला लागलं. ते कुत्र्याचं पिल्लूही या माकडासोबत शांतपणे कोणतीही गडबड न करता राहिलं.
सौजन्य- रप्टली टीव्ही, यूट्यूब
लोकांना याचं नवल वाटून त्यांनी या माकडाला पाहायला गर्दी केली. त्या माकडाजवळ जायचा प्रयत्नही केला. त्यावेळी ही माणसं त्या कुत्र्याच्या पिल्लाला इजा पोहोचवतील की काय असं वाटून हे माकड या कुत्र्याच्या पिल्लाचं संरक्षण करायला लागलं. या पिल्लाला घेऊन ते माकड सहजपणे इथे तिथे उड्या मारत होतं. या माकडाला तिथल्या स्थानिक रहिवाश्यांनी थोडंफार खायला दिलं. ते या माकडाने स्वीकारलंही. पण शेवटपर्यंत या माकडाने कुत्र्याच्या त्या छोट्याशा पिल्लाची साथ सोडली नाही.
माकडात माणसामध्ये असलेल्या बऱ्याच भावना असतात असं आपण एेकतो. पण एखाद्या वाघिणीने कुत्र्याच्या पिल्लांचा सांभाळ केल्याची किंवा एका कुत्र्याने चित्त्याच्या पिल्लाचा सांभाळ केल्यासारखी अनेक उदाहरणं आपण इंटरनेटवर पाहतो. शेवटी प्रेमाची भावनाच सर्वव्यापी आहे हेच खरं!